विकास कामे युद्ध पातळीवर : रेल्वेस्थानकाला छावणीचे स्वरूपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मंगळवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत रेल्वेस्थानकावर विकास कामे करण्यात आली. तर बंदोबस्तासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी अतिरिक्त तुकड्या बोलविल्यामुळे रेल्वेस्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मंगळवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ११.१५ वाजता एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रशासनाने जनरल वेटिंग हॉलमध्ये एक भव्य व्यासपीठ साकारले आहे. सोमवारी दिवसभर रेल्वेस्थानकाच्या रंगरंगोटीचे काम सुरू होते. फुटलेल्या ग्रेनाईट, रेल्वेस्थानकाची शोभा वाढविण्यासाठी झाडे रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. रेल्वेमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध ठिकाणच्या विकास कामांचा शुभारंभ तसेच रेल्वेगाड्यांना हिरवी झेंडी दाखविणार असल्यामुळे तांत्रिक विभागाची चमू दिवसभर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या यंत्रणेची जुळवाजुळव करीत होती. रेल्वेस्थानकावर येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी तसेच असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने कंबर कसली आहे. लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ, मनमाड, नाशिक, अकोला, वर्धा येथून १२० अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलविले आहेत. तर रेल्वे सुरक्षा दलानेही अजनी राखीव दलातून १०० जणांचा ताफा बंदोबस्तासाठी बोलविला आहे.
रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त रेल्वे प्रशासन सज्ज
By admin | Published: May 09, 2017 1:53 AM