लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे २२ मार्चपासून आरक्षण कार्यालय बंद आहे. दोन महिन्यानंतर २२ मे पासून आरक्षण कार्यालय सुरु करण्यात येणार आहेत.आरक्षण कार्यालय सुरु झाल्यानंतर खिडक्यांवर तिकिटांची रक्कम परत करण्यात येणार नाही. केवळ १ जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकिटेच आरक्षणाच्या खिडक्यांवर मिळणार आहेत. अशा स्थितीत आरक्षणाच्या खिडक्यांवर गर्दी न करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर, अजनी, वर्धा, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर, बल्लारशाह, आमला, पांढुर्णा, बैतुल आणि परासियात २२ मेपासून आरक्षण खिडक्या सुरु करण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान नागपूर स्थानकावर ३ आणि अजनीत २ खिडक्या सुरू राहतील. इतर ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत १-१ खिडकी सुरू राहील. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इतवारी, गोंदिया, भंडारा रोड, राजनांदगाव, डोंगरगड, छिंदवाडा, नागभीड, नैनपूर, बालाघाटचे आरक्षण कार्यालय २२ मे पासून सुरू राहतील. रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांच्या तिकिटांची रक्कम परत मिळण्याची तारीख ६ महिने वाढविण्यात आल्यामुळे प्रवाशांनी आरक्षण खिडक्यांवर गर्दी करू नये, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. ज्यांना प्रवास करणे खूपच गरजेचे आहे, अशाच प्रवाशांनी आरक्षण कार्यालयात येण्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.१४ रेल्वेगाड्यांना राहणार नागपुरात थांबारेल्वे मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार १ जूनपासून चालविण्यात येणाऱ्या १०० जोडी रेल्वेगाड्यांपैकी ७ जोडी गाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर थांबणार आहेत. यातील बहुतांश रेल्वेगाड्या दररोज धावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२७२४/०२७२३ नवी दिल्ली-हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगणा एक्स्प्रेस, ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई मेल, ०२८३३/०२८३४ अहमदाबाद-हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, ०२८०५/०२८०६ विशाखापट्टणम-नवी दिल्ली-विशाखापट्टणम एपी एक्स्प्रेस, ०२२८५/०२२८६ सिकंदराबाद-निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस, ०२२९५/०२२९६ दानापूर-बंगळुर-दानापूर संघमित्रा एक्स्प्रेस आणि ०२७९२/०२७९१ सिकंदराबाद-दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्र्क अधिकारी एस. जी. राव यांच्या मते, या गाड्यांपैकी सिकंदराबाद-निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा धावेल. तर इतर गाड्या दररोज चालविण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले आहे. या गाड्यात फक्त एसी आणि स्लिपर कोच राहतील.
आजपासून सुरु होणार रेल्वे आरक्षणाच्या खिडक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:37 AM
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे २२ मार्चपासून आरक्षण कार्यालय बंद आहे. दोन महिन्यानंतर २२ मे पासून आरक्षण कार्यालय सुरु करण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देपरतावा देणार नंतर : प्रवाशांनी गर्दी न करण्याच्या सूचना