नागपूर : विदर्भात बहुतेक जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आता परतला आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागवगळता २४ तासांपासून ढगांनी व्यापलेले विदर्भाचे आकाश आता माेकळे झाले आहे. मात्र मागील दाेन दिवसांपासून पावसाळी परिस्थितीमुळे वातावरणात जाणवत असलेला गारवा पुढे अधिक तीव्र हाेण्याची शक्यता असून, थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मागील २४ तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झाेडपले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. त्याखालाेखाल अकाेला जिल्ह्यातही गारपिटीसह अवकाळी पावसाने कहर केला. येथे ३८.१ मिमी पावसाची नाेंद झाली. गडचिराेलीत २७ मिमी, तर बुलढाणा २३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूर शहरात १.८ मिमी पाऊस झाला.
बुधवारी आकाशातील ढग निवळायला सुरुवात झाली. चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरीचा काही भाग आणि नागपूर जिल्ह्यात उमरेड, भिवापूरचा काही परिसरावर ढगांची उपस्थिती हाेती; पण दिवसभर कुठेही पावसाची नाेंद झाली नाही. इतर सर्वत्र आकाश माेकळे झाले हाेते. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली व ते १६.८ अंश नाेंदविण्यात आले. चंद्रपूर, ब्रह्मपुरीत ५.१ अंशाच्या वाढीसह १८.४ अंश तापमान नाेंदविले गेले. इतर जिल्ह्यात तापमान कमी व्हायला लागले आहे. बुलढाण्यात सर्वात कमी १३ अंश तापमान हाेते. त्यानंतर गाेंदिया १४.२ अंश, अमरावती १४.७ अंश तापमान हाेते. गुरुवारपासून किमान तापमान आणखी खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. नव्या वर्षाची सुरुवात थंडीच्या लाटेने हाेण्याची शक्यता विभागाने नाेंदविली आहे.