राजधानी एक्स्प्रेसमध्ये गोळी चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:28 AM2018-11-17T00:28:59+5:302018-11-17T00:29:47+5:30
बिलासपूरवरून नवी दिल्लीला जात असलेल्या १२४४१ राजधानी एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये गुरुवारी रात्री हवालदाराला गोळी लागल्याच्या घटनेत आमला लोहमार्ग पोलिसांनी एसपीजीचे सिक्युरिटी असिस्टंंटविरुद्ध (मेजर) गुन्हा दाखल केला. आरोपीला शुक्रवारी जामीन मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिलासपूरवरून नवी दिल्लीला जात असलेल्या १२४४१ राजधानी एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये गुरुवारी रात्री हवालदाराला गोळी लागल्याच्या घटनेत आमला लोहमार्ग पोलिसांनी एसपीजीचे सिक्युरिटी असिस्टंंटविरुद्ध (मेजर) गुन्हा दाखल केला. आरोपीला शुक्रवारी जामीन मिळाला आहे.
आमला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी एस. एन. मिश्रा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री बिलासपूर-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी-६, बर्थ क्रमांक ६३ वर प्रवास करीत असलेल्या प्रवाशाला गोळी लागल्याची सूचना मिळाली होती. त्यावर प्लॅटफार्म क्रमांक ३ वर रात्री १०.४० वाजता जखमी प्रवाशाला गाडीखाली उतरविण्यात आले. जखमी प्रवाशाच्या पायातून रक्त जात होते. जखमी प्रवाशाने आपले नाव मन्नु थॉमस (२८) रा. केरळ हल्ली मुक्काम जीआरसी सेंट्रल नागपूर असे सांगितले. तो एमआयजी बंगळुरमध्ये हवालदाराच्या पदावर तैनात आहे. तो आॅगस्ट २०१८ पासून बास्केटबॉल टीममध्ये प्रॅक्टीस करण्यासाठी आला होता. आपल्या अधिकाºयांसोबत तो राजधानी एक्स्प्रेसने नागपूरवरून दिल्लीला जात होता. थॉमसने सांगितले की, नागपुरातून गाडी सुटल्यानंतर त्याच्या गावातील राजेश मोहन हा एसपीजीत सिक्युरिटी असिस्टंट (मेजर) आहे. त्याच्याशी बोलण्यासाठी तो १०.१५ वाजता गेला होता. बोलताना राजेशने आपले पिस्तुल लोड केले. यात एक राऊंड फायर होऊन त्याच्या पायावर गोळी लागली. आरोपी राजेश मोहन दारू पिऊन असल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जखमी मनु थॉमसला वायुसेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मनु थॉमस यांच्या तक्रारीवरून आरोपी राजेशविरुद्ध भादंविच्या कलम ३३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यास जामिनावर सोडण्यात आले आहे. त्याच्यापासून ९ एमएमची पिस्तुल, १३ जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.