राम गणेश गडकरी यांचे स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:42 AM2020-01-22T05:42:16+5:302020-01-22T05:42:22+5:30
प्रसिद्ध साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे सावनेर येथील स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित झाले आहे.
- प्रवीण खापरे
नागपूर : प्रसिद्ध साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे सावनेर येथील स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित झाले
आहे. सरकारने तर पालकत्वासाठी ते १२ वर्षांपूर्वीच मोकळे केले. दुर्दैवच म्हणा की, आजवर एकही पालक त्यांच्या स्मृतिस्मारकाला लाभलेला नाही.
प्रेमसंन्यास, राजसंन्यास, एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, गर्वनिर्वाण, मित्रप्रीती, वेड्यांचा बाजार अशी दर्जेदार नाटके देणाऱ्या गडकऱ्यांनी अखेरचा श्वास सावनेर येथील त्यांचे मोठे बंधू विनायकरावांच्या घरात घेतला. या लेखणीसम्राटाच्या आयुष्यातील अखेरचे २६ दिवस या भूमीला लाभले, म्हणूनच या स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र सरकार, रंगकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी त्याकडे कानाडोळा केलेला दिसतो. सावनेर येथे ते घर संरक्षित करण्यात आले आहे आणि स्मारकही उभारण्यात आले आहे. मात्र, आता ते बेवारस पडले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ‘महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ सुरू करण्याचा
शासन निर्णय २ फेब्रुवारी २००७ पासून अंमलात आला. यासाठी आर्थिक तरतूदही आहे. मात्र, या निर्णयाच्या अनुषंगाने गडकºयांच्या स्मृतिस्थळासाठी कोणाकडून प्रतिसाद मिळाला नाही.
१०१ वा स्मृतिदिन
राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी सावनेर येथे निधन झाले. गेल्या वर्षीच राम गणेश गडकरी स्मृती निलयम या संस्थेतर्फे त्यांची पुण्यस्मरण शताब्दी साजरी झाली. यंदा १०१ वा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.
आम्ही शासन निर्णय निर्गमित झाल्यापासूनच पाठपुरावा करीत आहोत, मात्र कुणीच उत्सुक दिसत नाही. समाजातील सांस्कृतिक जाण असलेल्या प्रथितयश नागरिकांनी यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. कुणी साथ दिली तर गडकरी स्मृतिस्थळाचा विकास शक्य आहे.
- राजेश पेंढारी, सचिव, राम गणेश गडकरी स्मृती निलयम