महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते राम जेठमलानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:47 PM2019-09-09T23:47:45+5:302019-09-09T23:50:13+5:30
दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती. तसेच, या प्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही युक्तिवाद केला होता. एम. आर. डागा यांचे चिरंजीव अॅड. राजेंद्र डागा यांनी ही आठवण सांगितली.
सात दशके वकिली करणारे राम जेठमलानी यांचे रविवारी निधन झाले. ते अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये आरोपींच्या वतीने लढले होते. न्यायालयीन प्रकरणांच्या निमित्ताने त्यांचे काहीवेळा विदर्भात येणे झाले. त्यात अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्याचा समावेश आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयामध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. जेठमलानी यांनी या दोन्ही न्यायालयांमध्ये आरोपींच्या वतीने बाजू मांडताना आपल्या कायदेविषयक ज्ञानाने सर्वांना प्रभावित केले होते. नवोदित वकिलांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या.
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचे अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. काही महिन्यापूर्वी साईबाबासाठी जेठमलानी यांची सेवा घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. जेठमलानी यांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रेही देण्यात आली होती. परंतु, काही कारणांमुळे ती गाडी पुढे सरकली नाही. त्यांनी नागपुरात यावे, असे प्रत्येकाला वाटत होते.