लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता मुलींनाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा देता येणार आहे. यामुळे एनसीसीच्या कॅडेट्स असलेल्या मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. एनडीएमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग गवसला असून, या माध्यमातून देशाचे रक्षण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. नागपुरात एनसीसीच्या शेकडो कॅडेट्स असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
जगातील अनेक देशांमध्ये महिला जवानांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली जाते. भारतात मात्र याबाबतीत काहीशी उदासीनता होती. पर्मनंट कमिशनसाठी महिला अधिकाऱ्यांनी मोठा लढा दिला. भारतात ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, नौदल अकादमी, हवाई दल अकादमीत मुलींना संधी दिली जाते. मात्र, तिन्ही दलांसाठी लागणारे अधिकारी तयार करणाऱ्या ‘एनडीए’मध्ये मुलींना प्रवेश नव्हता. क्षमता असूनही पदवी होईपर्यंत त्यांना लष्करी सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. न्यायालयाच्या या निकालाने मुलींची ही प्रतीक्षाही संपुष्टात आली आहे. शहरात एनसीसीमध्ये तीनशेहून अधिक मुली असून, यात इयत्ता आठवी व नववीच्या मुलींचादेखील सहभाग आहे. कोरोनामुळे एनसीसी परेड, सराव यांना फटका बसला असला आहे.
असा आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत मुलांप्रमाणेच ‘एनडीए’ची परीक्षा मुलींना देता येईल, असे स्पष्ट केले आहे. महिलांच्या क्षमतेवर शंका घेणे हा लिंगभेदाचाच प्रकार असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती. अधिवक्ता कुश कालरा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या निर्णयानुसार मुलींना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेस बसण्याची मुभा दिली जाणार आहे. कोरोनामुळे ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार असून, सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २०२२ चा जून महिना उजाडणार आहे.
लष्करात प्रवेशासाठी
बारावीनंतर ‘एनडीए’, तर पदवी स्तरावर ‘आयएमए’चे प्रवेश होतात. ‘आयएमए’ प्रवेशाला थेट कमिशन, तर ‘ओटीए’मध्ये ‘नॉन टेक्निकल’साठी ‘एसएससी’ (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) मार्फत प्रवेश दिला जातो. अभियांत्रिकी पूर्ण केलेल्यांना सैन्य दलातील अभियंते, सिग्नल क्षेत्रात संधी असते. मुलींसाठी प्रवेशाची प्रक्रिया वेगळी असून, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस ही परीक्षा होते. मुलींना ‘ओटीए’त प्रवेश दिला जातो. निवडीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. याशिवाय वायुदलासाठी एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. नौदलातदेखील विविध विभागात मुलींची निवड केली जाते.
मुलींकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
मुलींसाठी एनडीए प्रवेशाची संधी दिल्याचा निर्णय ऐतिहासिकच म्हणावा लागेल. मुलींना संधी मिळाली तर काय होऊ शकते हे निश्चितच भविष्यात समोर येईल. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संरक्षण क्षेत्रातही मुली देशाची सेवा करू शकतील.
-अनुष्का ठाकरे, एनसीसी कॅडेट
‘एनडीए’मध्ये मुलींना प्रवेशाची संधी फार अगोदरच द्यायला पाहिजे होती. मुलींमध्ये प्रचंड क्षमता असते, केवळ विश्वास दाखविण्याची गरज आहे. सरकारने एनसीसीत मुलींचा टक्का वाढविण्यासाठी व सुविधांमध्ये वाढ करण्यासाठीदेखील पुढाकार घेतला पाहिजे.
- राजनंदिनी नहाते, एनसीसी कॅडेट