नागपुरात क्रिकेट बुकीकडून तीन कोटींच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:36 PM2019-01-07T23:36:50+5:302019-01-07T23:38:46+5:30
तीन कोटी रुपयांची खंडणी मागून नुकसान करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांनी कुख्यात बुकी राज अलेक्झांडर आणि त्याचा साथीदार विक्की जयस्वाल (रा. अंबाझरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन कोटी रुपयांची खंडणी मागून नुकसान करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांनी कुख्यात बुकी राज अलेक्झांडर आणि त्याचा साथीदार विक्की जयस्वाल (रा. अंबाझरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात तक्रारदार आनंद तुकाराम बोंदरे (वय ३७) नामक प्रॉपर्टी डीलर असून, तो मानकापूरात राहतो. आनंद, राज आणि विक्की हे तिघे रविवारी रात्री मेयो चौकातील मदिरा बारमध्ये दारू पीत बसले होते. दारूच्या नशेत टुन्न झाल्यानंतर या तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पहाटे २ ते २.३० च्या सुमारास आनंद गणेशपेठ ठाण्यात पोहोचला. त्याने राज आणि विक्कीने आपल्याला तीन कोटी रुपये मागितले. रक्कम दिली नाही तर तुझे नुकसान करू, अशी धमकी देऊन मारहाण केली, असे पोलिसांना सांगितले. यावेळी तो दारूच्या नशेत अक्षरश: झिंगत होता. त्यामुळे सकाळपर्यंत पोलिसांनी त्याला शुद्धीवर आणत त्याची तक्रार नोंदवून घेतली. ही माहिती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांना देण्यात आली. त्यांनी तक्रारीची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी राज अलेक्झांडर आणि विक्की जयस्वाल या दोघांविरुद्ध कलम ३८५, ३२३ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, आनंद, राज आणि विक्की हे तिघे मित्र असून, राज हा मध्य भारतातील चर्चित बुकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर त्याचे पंटर कोट्यवधींची खायवाडी-लगवाडी करतात. पोलिसांनी त्याला अनेकदा पकडले असून, गेल्या काही दिवसांपासून त्याने बुकी आणि पोलिसांच्या मध्ये असलेला दुवा पकडून मध्यस्थाला लाखोंची मलाई खिलवत आपली मानगूट सोडवून घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजने आपली कोट्यवधींची रक्कम आपल्या निकटस्थ, मित्रांना वेगवेगळ्या धंद्यात गुंतविली आहे. त्यामुळे राजकडे पंटर म्हणून काम करणारी मंडळी कुणी प्रॉपर्टी डीलर, कुणी बिल्डर तर कुणी कोणत्या वेगवेगळ्या नावाने वावरत आहे.
सेटिंगचे प्रयत्न फिस्कटले
या प्रकरणाला दुसरा एक पैलू जुळला असून, या प्रकरणाची माहिती कळताच सेटिंगचे प्रयत्न सुरू झाले. मांडवलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्याम नामक व्यक्तीने तक्रार करणारा आनंद आणि राज तसेच विक्कीकडे वेगवेगळी ‘बोली’ केली. त्याचमुळे सकाळी शुद्धीवर आल्यानंतर आनंदने आपल्याला काही आठवत नाही, असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर पवित्रा घेतला होता. मात्र, पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी कणखर भूमिका घेतल्याने खंडणीची मागणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला तर दुसरीकडे सेटिंगचे प्रयत्न फिस्कटले. या प्रकरणाच्या संबंधाने पोलीस आणि उपराजधानीतील बुकी बाजारात उलटसुलट चर्चा सुरू आहे.