नागपुरात नातेवाईकाने केला चिमुकलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:09 PM2018-06-11T12:09:42+5:302018-06-11T12:09:53+5:30
शेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केला. ७ जूनला दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केला. ७ जूनला दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. शनिवारी रात्री या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. अजय दिलीप भारती (वय २३) असे त्याचे नाव आहे.
आरोपी अजय भारती नंदनवनमध्ये राहतो. तो खासगी वाहनचालक आहे. शेजारी त्याचे नातेवाईक राहतात. नातेवाईकांची ८ वर्षीय मुलगी ७ जूनला दुपारी ४ वाजता घरासमोर खेळत होती. त्यावेळी कार घेऊन आरोपी तेथे आला. मुलीच्या आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला डॉल घेऊन देतो, असे आमिष दाखवून सोबत नेले. कारमध्ये बसवल्यानंतर वाहनातच त्याने तिच्यावर बलात्कार केला. अनैसर्गिक कृत्यही केले. कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना तलवारीने ठार मारेन, अशी धमकी देऊन आरोपीने तिला घरी नेऊन सोडले. भीतीमुळे मुलगी गप्प राहिली. रात्री मुलीची प्रकृती बिघडली. तेव्हा आईने तिला विचारणा केली असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. दोन दिवस बदनामीच्या धाकाने गप्प बसलेल्या मुलीच्या आईने शेवटी ९ जूनला या प्रकरणाची तक्रार नंदनवन ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचे कलम ३६३, बलात्कार (३७६), अनैसर्गिक कृत्य (३७७) आणि धमकी देणे (५०६) च्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पीडित अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसारही कारवाई केली. त्याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. पुढील चौकशी उपनिरीक्षक बांबोळे करीत आहेत.