नागपूर : एकीकडे यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असताना दुसरीकडे कोरोना योद्ध्यांनीच लसीकरणाकडे कानाडोळा केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कोरोनाचा झपाट्याने फैलाव होणाऱ्या या जिल्ह्यांत कुठेही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. कोरोना योद्धेच जर लसीबाबत इतके उदासीन असतील, तर उद्या सामान्यांचा प्रतिसाद कसा असेल, असा प्रश्न उपस्थित होतो.
यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही. रविवारी आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेल्या अमरावतीत केवळ ५६ टक्के व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला. नागपुरात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद होता. पण, प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण वाढले. अकोल्यात तर पहिला टप्पा सुरूच आहे, वर्धेत ६४ टक्के असा थोडाफार समाधानकारक आकडा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात केवळ १२ हजार ९१० जणांनाच लस देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना फोन करून लसीकरणासाठी बोलाविले जात आहे. पण तरी प्रतिसाद नाही. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त ५६.०१ टक्के लसीकरण झाले. दुसऱ्या टप्प्यात शनिवारपर्यंत २.९५ टक्के लोकांनी लस घेतली. अकोला जिल्ह्यात ११ हजार ८८५ लाभार्थींनी लस घेतली. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६२४ आहे.
तांत्रिक दोष, अन्य व्यक्तींना लस व चोरीही
ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक दोष सध्याही येत आहेत. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी आता करता येत नाही. अचलपूर येथे आरोग्य सेवेतील व्यक्तीच्या नावावर अन्य तीन व्यक्तींना लसीकरण केल्याची तक्रार झालेली आहे. नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसोबतच नातेवाईक, मित्रांना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांना लस दिली. यातील काहींनी फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यातील चतारी आरोग्य केंद्रातून कोविड लसीचे ७ डोस चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यात सुरूवातीच्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद असताना प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण होऊ लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ७१७ लक्ष्यापैकी १५ हजार ३१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात पहिल्या फळीतील १६ हजार ५५ कोविड योद्ध्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार २५५ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यात प्रथम टप्प्यात ६८२६ तर दुसरा टप्प्यात ९०१ आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८० टक्के कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण झाले आहे. वाशिम जिल्ह्यात १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ११३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात ६४३ डोस देण्यात आले.
लस घेऊन कोरोना झाल्याने अल्प प्रतिसाद
लसीबाबत सुरुवातीपासूनच अनेक समज-गैरसमज आहेत. आरोग्य विभागातीलच अधिकारी, कर्मचारी स्वत:हून लसीकरणाला पुढे येण्यास तयार नव्हते. त्यातच लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झालेली अनेक रुग्ण निघत आहेत. त्यामुळे लसीवरचा विश्वासच उडत आहे. उलट ही लस घेतल्याने आपल्याला इतर त्रास होतो, असा गैरसमज कायम आहे.