शिधापत्रिकाधारकांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचे रेशन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:04+5:302021-04-08T04:09:04+5:30
नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घोषित केले आहेत. या काळात नागरिकांसाठी आधार ...
नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घोषित केले आहेत. या काळात नागरिकांसाठी आधार असलेले स्वस्त धान्याचे दुकान यंदा अडचणीत आले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एप्रिल महिन्याचे धान्य शिधापत्रिकाधारकांना मिळणार नाही असे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. एफसीआयने अन्न व नागरी पुरवठा विभागाला एप्रिल महिन्याच्या धान्याचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. रेशन धान्य दुकानदारांनी चालानच्या रूपात भरलेला पैसाही फसल्याची ओरड दुकानदारांची आहे.
मार्च महिन्यात पॉस मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे १७ मार्चनंतर मार्च महिन्याचा धान्याचा पुरवठा रेशन दुकानदारांनी करण्यास सुरुवात केली. त्यातच मार्च महिन्यातही निर्बंध लागल्याने अनेक रेशन दुकानदारांच्या धान्याची उचल झाली नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या गोदामात माल पडून होता. प्रशासनानेही त्यात निष्काळजीपणा केल्याने ३० मार्चच्या आत एप्रिल महिन्याच्या धान्यासाठी एफसीआयमधून उचल करणे गरजेचे होते. पण सरकारी सुट्या, लॉकडाऊन यामुळे प्रशासनाने धान्याची उचल वेळेत केली नाही. आज ८ तारीख झाल्यानंतरही एप्रिल महिन्याचा माल रेशन दुकानात पोहोचला नाही. रेशनधान्य दुकानदार संघटनांचे म्हणणे आहे की, पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने धान्य उचलून, प्रशासनाची परवानगी घेऊन एप्रिल महिन्याच्या धान्याचा साठा करायला हवा होता; पण पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एफसीआयनेही एप्रिल महिन्याचे धान्य देण्यास नकार दिला आहे. अधिकारी आता रेशन दुकानदारांना मे महिन्याच्या धान्याची उचल करण्यास आग्रह करीत आहेत; पण मे महिन्याच्या धान्याच्या उचलीची प्रक्रिया २० तारखेनंतर सुरू होते. रेशन दुकानदारांनी एप्रिल महिन्याच्या धान्यासाठी भरलेले चालानचे पैसेही फसले आहेत. यासंदर्भात रेशन दुकानदार संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
- रेशन दुकानदारांची ओरड चुकीची
एफसीआयने धान्याची उचल करण्यास नकार दिला नाही. आमची एप्रिल महिन्याचे धान्य उचल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासंदर्भातील कागदपत्र आमच्याकडे आहेत, अशी माहिती अन्न पुरवठा विभागाकडून देण्यात आली.