रेशन दुकानात प्रत्येक महिन्याचेच धान्य मिळणार : जिल्हा पुरवठा अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:58 PM2020-04-03T22:58:56+5:302020-04-03T23:00:12+5:30
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था योजनांतर्गत शासनाने एप्रिल, मे, आणि जून-२०२० चे धान्य एकत्रितपणे मिळेल, असे घोषित केले होते. परंतु नवीन शासकीय निर्देशानुसार प्रत्येक महिन्याचे (एप्रिल, मे, जूनचे) धान्य त्या त्या महिन्यातच वितरित करावयाचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था योजनांतर्गत शासनाने एप्रिल, मे, आणि जून-२०२० चे धान्य एकत्रितपणे मिळेल, असे घोषित केले होते. परंतु नवीन शासकीय निर्देशानुसार प्रत्येक महिन्याचे (एप्रिल, मे, जूनचे) धान्य त्या त्या महिन्यातच वितरित करावयाचे आहे. म्हणून सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या धान्यसाठा पॉस मशीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, तेव्हा नागरिकांनी रेशन दुकानात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी केले आहे. शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्याचे धान्य आपल्या स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘मीच माझा रक्षक’ या संदेशाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
असे मिळणार धान्य
- अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना १५ किलो गहू २ रुपये प्रति किलोप्रमाणे आणि २० किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलोप्रमाणे असे एकूण ३५किलो धान्य मिळणार आहे.
- प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने आणि २ किलो धान्य ३ रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.
- फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना १ किलो साखर २० रुपये प्रति किलो दाराने मिळणार आहे.
५ किलो तांदूळ मोफत पण डाटा उपलब्ध नाही
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त ५ किलो तांदूळ प्रतिव्यक्ती प्रति महिना शासनाने जिल्ह्यास मंजूर केले आहे. अतिरिक्त धान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे. परंतु त्यांचा डेटा अजून पॉस मशीनवर उपलब्ध झालेला नाही तो डेटा व धान्य लवकरच उपलब्ध झाल्यानंतर याच एप्रिल महिन्यात वाटप करण्यात येईल व त्यानंतरही मे आणि जूनचे मोफत धान्य त्या-त्या महिन्यात वाटप करण्यात येईल.