आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:09 PM2019-05-14T22:09:38+5:302019-05-14T23:02:33+5:30
मान्सूनपूर्व तयारीची सुरुवात जिल्हा प्रशासनाने सुरु केली असून आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतली. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित साधनसामुग्री तयार ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक इमारती व पुलांची पाहणी करुन अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मान्सूनपूर्व तयारीची सुरुवात जिल्हा प्रशासनाने सुरु केली असून आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतली. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित साधनसामुग्री तयार ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक इमारती व पुलांची पाहणी करुन अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी ६ जुलैला झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना आलेल्या अडचणींचा अभ्यास करुन यावर्षी अतिपावसाची परिस्थिती निर्माण झाल्यास विभागांनी सज्ज राहावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा. त्या अधिकाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी करण्यात आलेल्या तयारीचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले. नागपूर जिल्ह्यात एकूण ३४१ गावे पूरप्रवण परिस्थिती असलेली आहेत. गेल्या वर्षी ६ जुलैला २८३ मि. मी. एवढा पाऊस तीन ते चार तासात पडला, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, ढगफुटीसारख्या घटनांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची सर्व तयारी अद्ययावत साधनसामुग्रीसह तयार असावी. आपत्ती व्यवस्थापनाच्या संबंधी साधनसामुग्री दुरुस्ती आवश्यक असल्यास निधीची मागणी करावी. निधी तातडीने उपलब्ध करुन देता येईल. यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील संबंधित २२ विभागांच्या कार्य वाटपाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मनपाने मान्सूनपूर्व नाले साफसफाई करावी. क्षेत्रीय कार्यालयात बोटी, लाईफ जॅकेट यासह आवश्यक ती साधन सामुग्री आहे किंवा नाही याची खातरजमा तहसीलदारांनी करावी. तसेच पाणी साचल्यानंतर साथीचे आजार पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने पुरेसा कर्मचारी वर्ग व औषधसाठा तयार ठेवावा, विद्युत विभागाने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे तसेच वाकलेले पोल सरळ करणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अपघातप्रवण स्थळी सूचना द्याव्यात. तसेच आणीबाणी प्रसंग उद्भवल्यास तालुक्याला हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करावी, आदी निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०१९ या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी इतर विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत लोकार्पण केले. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, उपजिल्हाधिकारी महसूल सुजाता गंधे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वय अधिकारी नितेश भांबोरे यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
१ जूनपासून जिल्हा नियंत्रण कक्ष
१ जूनपासून जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार आहे. टोल फ्री क्रमांक १०७७ आणि दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ असा आहे. नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात येणाऱ्याअधिकारी कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षात द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.