लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी दररोज हजारो लोकांची ये-जा असते. पण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही एटीएममध्ये सॅनिटायझरची व्यवस्था नाही. शिवाय सुरक्षा गार्ड नसल्याने अनेक ग्राहक पैसे काढण्यासाठी गर्दी करतात आणि मास्क न घालताच एटीएममध्ये जातात. सर्वच ग्राहक एटीएमच्या बटणांना स्पर्श करतात. प्रत्येक ग्राहक जीवन मुठीत घेऊन येतो आणि मनात संसर्गाची भीती घेऊन बाहेर पडतो. एटीएमच्या दाराला स्पर्श करताच संसर्गाच्या भीतीने मनाचा थरकाप होते. प्रत्येकाला भीती वाटते, पण नाइलाज असतो. सदर प्रतिनिधीने नागपुरातील काही बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता सर्वच एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव दिसून आला. बँकांनी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी प्रतिनिधीशी बोलताना केली.ग्राहकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्षएटीएम कार्ड, कॅबिनचे मेंटनन्स आणि सुरक्षा गार्ड ठेवण्याचे पर्याप्त पैसे बँका ग्राहकांकडून वसूल करतात. वर्षभर ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा केले जातात आणि बँकेच्या देखभालीसाठी खूप खर्च केला जातो. एटीएम देखभालीचे काम कंपन्यांचे असले तरीही विशेषत: कोरोनाच्या काळात किमान एटीएम कॅबिनमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेची व्यवस्था बँकांनी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली.बँक ऑफ बडोदा, नंदनवननंदवनन येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे भरणे आणि एटीएमची मशीन एकाच खोलीत आहे. याशिवाय ग्राहकांची गर्दी होती. बऱ्याच ग्राहकांनी मास्क घातले होते तर काही ग्राहक मास्क न घालताच रांगेत उभे होते. ग्राहकाला विचारणा केल्यावर त्याने मास्क घातला. पैसे काढण्यास दोन मिनिटे लागणार असल्याचे उत्तर त्या ग्राहकाने दिले. आतमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था नव्हती, शिवाय दारावर गार्ड दिसला नाही. सॅनिटायझर बँकांनी उपलब्ध करून द्यावे, असे ग्राहक म्हणाले.इंडियन बँक, महाल, सक्करदरा रोडबँकेलगत असलेल्या एटीएममध्ये फार कमी ग्राहक होते. एटीएमचे दार उघडे होते. आत पाहणी केली असता एसी बंद होते आणि सॅनिटायझर नव्हते. येणारे ग्राहक सॅनिटायझर न लावता पूर्वीच्या ग्राहकाने उपयोग केलेले बटण दाबून पैसे काढताना दिसून आले. ग्राहक म्हणाले, बटणांना हात लावताना भीती वाटते, पण नाईलाज आहे. बँकेने कोरोना काळात सॅनिटायझरची व्यवस्था करावी. हीच स्थिती सर्वच एटीएममध्ये असून भीती बाळगून पैसे काढावे लागत असल्याचे ग्राहक म्हणाला.बँक ऑफ महाराष्ट्र, मुंजे चौक, सीताबर्डीबँकेचे येथे तीन एटीएम मशीन आहेत. या ठिकाणी ग्राहकांची गर्दी दिसून आली. दारावर ग्राहकांच्या तपासणीसाठी गार्ड दिसला नाही. एक महिला दोन लहान मुलींसोबत पैसे काढण्यासाठी आत आली. तिने आणि तिच्या मुलींनी मास्क घातला नव्हता. मास्कसंदर्भात विचारले असता तिने काहीच उत्तर दिले नाही. पूर्वी पाहणीदरम्यान या एटीएमध्ये बँकेने सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. पण आता सॅनिटायझर दिसले नाही. एटीएम जास्त असल्याने अनेक ग्राहक एकाचवेळी आत जाताना दिसले.बँक ऑफ इंडिया, सीताबर्डीयेथे दोन एटीएम मशीन आहेत. या ठिकाणी जास्त ग्राहक एकाच वेळी आत जाताना दिसले. त्यांना अटकाव करण्यासाठी दारावर गार्ड नव्हता. येणारे ग्राहक मास्क लावून दिसले. ग्राहकांनी सॅनिटायझरची व्यवस्था नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आम्ही स्वत:च सॅनिटायझर सोबत ठेवतो. सॅनिटायझर हाताला लावून बटणांना स्पर्श केल्याचे ग्राहक म्हणाला. सीताबर्डी वर्दळीच्या भागात ग्राहक मोठ्या संख्येने येतात. कोरोना संसर्गाच्या भीतीने बँकेने सुरक्षा प्रदान करावी, असे ग्राहक म्हणाले.स्टेट बँक ऑफ इंडिया, पंचशील चौक, रामदासपेठया ठिकाणी अनेक ग्राहक एकाचवेळी आता शिरताना दिसून आले. मशीनवर दोन ग्राहक उभे होते. कोरोना संसर्गाची कुणालाही भीती दिसून आली नाही. सॅनिटायझर उपलब्ध नव्हते, शिवाय दारावर गार्ड दिसला नाही. लोक मास्क घालून होते. एका ग्राहकाने पैसे काढण्याआधी स्वत:जवळील सॅनिटायझर काढून हाताला आणि बटणांना लावले. ही व्यवस्था बँकेने करावी, असे ग्राहक म्हणाला. प्रत्येक ग्राहकाने एटीएममध्ये येताना सॅनिटायझर स्वत:च आणावे, असे तो म्हणाला.ग्राहकांनी काय करावेएटीएममध्ये पैसे काढताना तोंडावर मास्क लावावा.ग्राहकाने खिशात सॅनिटायझर ठेवावा.शक्यतोवर ग्राहकांनी हॅण्डग्लोव्हज घालून बटणांना हात लावावा.गर्दी न करता एकानेच आता जावे.ग्राहकाने सहकाऱ्यासोबत एटीएममध्ये जाऊ नये.बँकांनी काय करावेएटीएमचे दरवाजे सेन्सॉरने उघडणे व बंद करण्याची व्यवस्था करावी.संसर्ग थांबविण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.एटीएममध्ये गर्दी टाळण्यासाठी दारावर सुरक्षा गार्ड ठेवावा.ग्राहकासाठी गार्डने दरवाजा उघडावा.गार्डने दारावरच ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर टाकावे.बँकेने एटीएम मशीन वारंवार सॅनिटाईझ्ड करावी.
रिअॅलिटी चेक: नागपुरात एटीएममध्ये प्रवेश करणे धोकादायकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 9:06 PM