इमारत करात मिळणार सवलत
By admin | Published: January 3, 2017 02:36 AM2017-01-03T02:36:13+5:302017-01-03T02:36:13+5:30
राज्य सरकारच्या १९७९ च्या निर्णयानुसार निवासी इमारतीचे क्षेत्रफळ १५० चौरस मीटरपेक्षा अधिक असेल
मनपाच्या कर विभागाचा निर्णय : तीन लाख नागरिकांना दिलासा
नागपूर : राज्य सरकारच्या १९७९ च्या निर्णयानुसार निवासी इमारतीचे क्षेत्रफळ १५० चौरस मीटरपेक्षा अधिक असेल आणि ज्या मालमत्ताचे वार्षिक भाडे १५०० रुपयाहून पेक्षा अधिक असेल, अशा निवासी इमारतीवर १० टक्के इमारत कर आकारला जातो. यात प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीयांचा समावेश आहे. या करदात्यांना दिलासा देण्यासाठी २०० चौरस मीटरपर्यंतच्या निवासी बांधकामावर मोठ्या निवासी इमारत कर सूट देण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन समितीने घेतला आहे. या निर्णयाचा शहरातील तीन लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यासोबतच २०१ ते ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या निवासी इमारतीला ३ टक्के, ३०१ ते ५०० चौ. मी. पर्यत ५ टक्के तर ५०० चौरस मीटरहून अधिक निवासी बांधकाम असलेल्या इमारतीवर १० टक्के दराने मोठ्या निवासी इमारत कर आकारण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे, अशी माहिती समितीचे सभापती गिरीश देशमुख यांनी सोमवारी दिली.
नागपूर शहरात ५ लाख ४५ हजार २५१ मालमत्तावर कर आकारणी केली जाते. यातील ६० ते ७० टक्के लोकांचे निवासी बांधकाम २०० चौरस मीटरच्या आत आहे. नवीन इमारत कर आकारण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नोटाबंदीच्या कालावधीत ६६,७३४ मालमत्ता धारकांनी थकीत कर जमा केला. विशेष म्हणजे यात १९७०-७१ सालापासूनचा थकीत कर भरणाऱ्यांचा समावेश आहे. जुन्या नोटांच्या माध्यमातून मालमत्ता कराची २९ कोटी ३५ लाखांची वसुली झाली आहे.
डिसेंबरअखेरीस मालमत्ता कराच्या स्वरुपात ११५ कोटी ६५ लाख वसूल करण्यात आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली वसुली २ क ोटी ६५ लाखांनी अधिक आहे. एलबीटीतून ४६१ कोटी तर बाजार शुल्कातून ४ कोटी ५९ लाखांचा महसूल जमा झाला आहे. नोटाबंदीच्या अखेरच्या तीन दिवसात २९ ते ३१ डिसेंबर यादरम्यान ४.५९ कोटींची वसुली झाली आहे. परंतु नोटाबंदीच्या कालावधीत २९.३५ कोटींची वसुली होऊ नही वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
शासन मंजुरीनंतर अशी होईल कर आकारणी
निवासी बांधकाम प्रस्तावित इमारत कर
२०० चौ. मी. निरंक
२०१ ते ३०० चौ.मी. ३ टक्के
३०१ ते ५०० चौ.मी. ५ टक्के
५०० चौ.मी.पेक्षा अधिक १० टक्के
उद्दिष्ट व जमा झालेला महसूल
कराचे स्वरुप उद्दिष्ट(कोटी) वसुली(डिसेंबरपर्यंत)
एलबीटी ७५० ४६१
मालमत्ता ३०६ ११५.६५
बाजार शुल्क ७.५५ ४.५९
एकूण १०६३.५५ ५८१.२४