अंतर्गत शक्ती ओळखा व जीवनात यशस्वी व्हा
By admin | Published: January 4, 2015 01:00 AM2015-01-04T01:00:37+5:302015-01-04T01:00:37+5:30
तुम्ही बाहेर शोधता ते तुमच्याच जवळ आहे. तुम्ही अनोखे, विशेष आणि महान आहात. तुमची प्रशंसा करून कुणी तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तर काम करण्याची ऊर्जा मिळते.
सचिन बुरघाटे यांचा सल्ला : ‘स्वत:ला ओळखा’ या विषयावर चर्चासत्र
नागपूर : तुम्ही बाहेर शोधता ते तुमच्याच जवळ आहे. तुम्ही अनोखे, विशेष आणि महान आहात. तुमची प्रशंसा करून कुणी तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तर काम करण्याची ऊर्जा मिळते. आपल्यातील अंतर्गत शक्ती ओळखा आणि जीवनात यशस्वी व्हा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी भाषातज्ज्ञ आणि ट्रेनर सचिन बुरघाटे यांनी येथे दिला.
डॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने पालकांना त्यांच्या अंतर्गत शक्तीचा परिचय करून देण्यासाठी ‘स्वत:ला ओळखा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात शनिवारी करण्यात आले. आपल्यातील अंतर्गत शक्तीला ओळखून पालक आणि विद्यार्थ्यांनी काम केले तर यशाचे अनेक टप्पे गाठता येतील, असे ते म्हणाले. मंचावर प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, युनिमास अॅबाकसचे दिलीप जैन आणि डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे होते.
आत्मविश्वास वाढवा
बुरघाटे यांनी सांगितले की, जगात तुम्ही एकमेव आहात. स्वत्वाची भावना नेहमीच बाळगा. आत्मविश्वासाचा स्तर वाढवा. आत्मविश्वास जेवढा वाढेल तेवढे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. ध्येयपूर्तीसाठी जीवनात काय करायचे आहे, हे आधी ठरविले पाहिजे. लोक म्हणतात एवढे परिश्रम करण्याची गरज नाही, पण शेवटची संधी समजून प्रत्येकाने काम करावे.
माझ्या कामाचे यश नंतर दिसेल, असे लोकांना सांगा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करतो. इंग्रजीचे महत्त्व जास्त आहे, हे मला माहीत होते. जे लोक शिकत नाहीत, ते अज्ञानी नाहीत, पण ज्यांना आपल्यातील प्रतिभा दिसत नाहीत, ते अज्ञानी आहेत. तुम्ही कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकता. स्वत:तील क्षमता ओळखली तरच बदल दिसून येईल, असे बुरघाटे म्हणाले.
सकारात्मक लोकांमुळे प्रोत्साहन
तुमच्या सभोवताल सकारात्मक लोक राहिल्यास तुम्ही यशस्वी होता, हे स्पष्ट आहे. प्रोत्साहन देणाऱ्यांमुळे प्रेरणा मिळते. कुण्या मुलाला चांगले म्हटल्यास तो तसे वागण्याचा प्रयत्न करतो. जीवनात चांगले लोक फार कमी भेटतात. प्रतिकूल विचारसरणीचे लोक जास्त भेटत असल्यामुळे आपण आपल्याला भेटू शकत नाही किंवा सकारात्मक विचार करणे शक्य होत नाही. जीवनात नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची गरज असल्याचे ते म्हणाले.प्रास्तविक डॉ. पिनाक दंदे यांनी तर संचालक प्रीती सावळे यांनी केले. चर्चासत्रात डॉक्टर्स, समाजसेवक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीवनातील चुकांपासून शिका
जीवनातील चुका काही ना काही शिकवितात. ज्या लोकांनी जीवनात काहीतरी केले, त्यांना आपण यशस्वी म्हणतो. अशांची तुलना नेहमीच लुझरशी करतो. पण माझे स्पष्ट मत आहे की, विनरची तुलना विनरशीच व्हावी. समाजात नेहमीच असे दिसून येते की, मोठा व्यक्ती छोट्यांना चार ते पाच पद्धतीने ज्ञान देतो, पण तो मोठ्यांसमोर काहीच बोलत नाही. तेव्हा आत्मविश्वासाचा स्तर जास्त असावा लागतो. उदाहरण देताना बुरघाटे यांनी सांगितले की, तुम्ही स्वत:ला राजा समजा. तुम्ही कधीच वाकणार नाही. प्रत्येकाला वाटते की, जीवनात काहीतरी करावे, पण जे घाबरतात ते काहीच करीत नाही. निरंतर ज्ञान संपादन करा, असा उपदेश त्यांनी दिला.