रेकॉर्डब्रेक : तोतलाडोह प्रकल्पात दोन दिवसात १८ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:44 PM2019-08-27T22:44:27+5:302019-08-27T22:46:38+5:30
तोतलाडोह या सर्वात मोठ्या प्रकल्पात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक १८ टक्के जलसाठा वाढला आहे. मंगळवारी प्रकल्पातील साठा ३० टक्क्यांवर पोहचला. काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्टला तोतलाडोहमधील जलसाठा शून्यावर होता, हे विशेष!
नत्थू घरजाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक उपविभागात असलेल्या तोतलाडोह या सर्वात मोठ्या प्रकल्पात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक १८ टक्के जलसाठा वाढला आहे. मंगळवारी प्रकल्पातील साठा ३० टक्क्यांवर पोहचला. काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्टला तोतलाडोहमधील जलसाठा शून्यावर होता, हे विशेष!
मध्य प्रदेशातील चौरई (जि. छिंदवाडा) येथे पाणी रोखल्याने तोतलाडोह कोरडा पडला होता. परिस्थिती अशी होती की निम्म्याहून अधिक पावसाळा संपला तरी प्रकल्पातील मृतसाठा १५० दलाघमी होता. यामुळे सिंचन विभागापासून तर नागरिकांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंता पसरली होती. नागपूर महानगरपालिकेंतर्गत होणारा पाणीपुरवठा तोतलाडोह प्रक ल्पावर निर्भर आहे.
१० ऑगस्टपासून तोतलाडोहमध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती. १५ ऑगस्टला चौरईचे दोन गेट उघडण्यात आले होते. त्यामुळे तोतलाडोहमधील साठा दोन टक्क्यांवर पोहचला होता. २३ ऑगस्टला गेट बंद होईपर्यंत हा साठा १२.२० टक्के झाला होता. २५ ऑगस्टच्या सायंकाळी ४ वाजता चौराईचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. २७ ऑगस्टच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत ४८ तासांत तोतलाडोहमधील साठ्यात १८ टक्के वाढ होऊन साठा ३० टक्क्यांवर पोहचला होता. पेंच सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांनी ही माहिती दिली.
सिंचन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २८ ऑगस्टपर्यंत जलसाठ्यात पाच टक्के वाढ होऊ शकते. तोतलाडोहमध्ये साठा वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत तोतलाडोहमध्ये ४५ टक्के पाणी होते. मध्य प्रदेशात पडत असलेला पाऊस आणि चौरई प्रकल्पातील पाण्याचा साठा लक्षात घेता, परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.