आधी दुरांतोतील झटके कमी करा, मगच बुलेट ट्रेन चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:57 PM2018-03-28T22:57:17+5:302018-03-28T22:57:29+5:30
मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष व रेल्वे मेन्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष व रेल्वे मेन्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केले.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे सुरक्षिततेवर आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आलेले असताना त्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या समाधान सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला.
भटनागर म्हणाले, रेल्वेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. पदभरती, गु्रप डी श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचे निर्धारण, पर्यवेक्षकीय पदांकरिता ४,८०० ग्रेड पे आदी संघटनेच्यामागण्या प्रलंबित आहेत. चर्चेतून काही मागण्यांवर तोडगा निघाला असून काही प्रलंबित आहेत. आगामी काळात कर्मचाºयांच्या हिताचे प्रश्न सेंट्रल रेल्वे मजदूर संघ लावून धरणार आहे. देशव्यापी धरणे आणि निदर्शनाच्या माध्यमातून संघटना प्रशासनाचे लक्ष वेधुन घेणार आहे. रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वेप्रति विश्वास वाढविण्यासाठी त्यांना सुरक्षित प्रवासाची शाश्वती देणे गरजेचे आहे. परंतु कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, कामाचा ताण यामुळे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांच्या अडचणी प्रशासनाकडे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळेची बचत करण्यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारसा फायदा होणार नाही. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे नागपूर विभागाचे मार्गदर्शक विनोद चतुर्वेदी, झोनल कार्यकारिणीतील कार्यकारी अध्यक्ष देबाशिष भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधई, संघटक ई. व्ही. राव, वाय. डब्ल्यू, गोपाल, पुरुषोत्तम वानखेडे उपस्थित होते.
‘सीएसटीएम’ची इंचभर जागा देणार नाही
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ब्रिटिशकालीन हेरिटेज इमारतीत सध्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचे कार्यालय आहे.या संपूर्ण इमारतीला संग्रहालयाच्या रूपाने विकसित करण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालयाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे संग्रहालयासाठी या इमारतीची इंचभरही जागा देणार नाही, अशा इशारा आर. पी. भटनागर यांनी सरकारला दिला. त्यासाठी ८ मार्चपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, ३ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.