आपला मोबाईल क्रमांक नोंदवा, विजेसंबंधी माहिती मिळवा
By आनंद डेकाटे | Published: May 18, 2024 03:42 PM2024-05-18T15:42:08+5:302024-05-18T15:42:35+5:30
कार्यालयाचा चकरा मारण्याची गरज नाही : मोबाईल ॲप, ‘ऊर्जा’चॅटबॉटवर मिळणार प्रश्नांचे उत्तर
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजेसंदर्भातील विविध समस्या, प्रश्न यासाठी आता महावितरण कार्यालयात फोन करण्याची अथवा चकरा मारण्याची आता आवश्यकता नाही. महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा ‘ऊर्जा’चॅटबॉट वर ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. सोबतच त्यांना तक्रार देखील करता येणार आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांनी आधी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पाऊस असतो व अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी विजेचे पोल पडणे तसेच तारा पडणे, वारंवार वीज खंडित होणे आदी समस्या या कालावधीत मोठ्या प्रमाणावर घडतात, अशा परिस्थितीत कोणत्या ठिकाणी काय समस्या आली आहे याबद्दल ग्राहकांना माहिती मिळत नाही. या सुविधा ग्राहकांना मिळाव्यात याकरिता महावितरणाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे व याचेच परिणीती म्हणून महावितरणच्या 'महावितरण मोबाईल अॅप' आणि ‘ऊर्जा’चॅटबॉट विकसित केले आहे. या माध्यमातून माध्यमातून ग्राहकाला त्याच्या वीजबिलाची माहिती, वीजबिलाचा भरणा, विजेच्या तक्रारी, नवीन वीजजोडणीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
अशी करा मोबाईल क्रमांकाची नोंद : ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी वा बदल करण्यासाठी करण्यासाठी एमजीईजी<१२ अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवायचा आहे, अथवा महावितरणच्या संकेतस्थळावरुन आणि मोबाईल ऍप वरुन देखील ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंद किंवा बदल करता येतो.
मोबाईल क्रमांक नोंदणीचे लाभ : मोबाईल क्रमांकाची नोंद असलेले वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल करून अथवा नो पॉवर <१२ अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार देवू शकतात.