()
नागपूर : इंदोरा परिसरातील बुद्धनगर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम या कोरोनाच्या संक्रमणानंतर चांगल्याच प्रकाशझोतात आल्या. त्यांनी कोरोनाला मात देण्यासाठी तयार केलेला काढ्याने अनेकांचे जीव वाचविले, याचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे नागपूरच नाही तर विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक काढा घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. काढ्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत असल्याने महापालिकेने त्यांच्यावर गर्दी होत असल्याच्या कारणावरून कारवाई केली. महापालिकेच्या कारवाईने व्यथित झालेल्या डॉ. मेश्राम यांनी क्लिनिक बंद केल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांचा उद्रेक अनावर झाला. गुरुवारी सकाळपासून शेकडोच्या संख्येने लोक काढ्यासाठी आले होते आणि क्लिनिक सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली होती.
गेल्या वर्षभरापासून डॉ. प्रज्ञा या कोरोनाच्या आजारावर उपचार करीत आहेत. त्या आयुर्वेदाचार्य असून, बऱ्याच वर्षांपासून त्या प्रॅक्टिस करीत आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या काढ्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या काढ्याची माऊथ पब्लिसिटी इतकी झाली की गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला या जिल्ह्याबरोबरच मध्य प्रदेशातूनही कोरोनाचे रुग्ण काढ्यासाठी येऊ लागले. यात सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी व सर्वच घटकातील लोकांचा समावेश आहे. त्या कोरोनाच्या रुग्णावर नाडी परीक्षण करून उपचार करतात. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना त्यांनी बरे केले असल्याचे लोकांचे अनुभव आहे.
त्यामुळे सकाळपासून त्यांच्या घरापुढे लोकांची गर्दी होते. गर्दीचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून बाजूच्या मैदानात पार्किंगची व रुग्णांची सोय केली आहे. मोठ्या संख्येने लोक येत असल्याने गर्दी होत असल्याचे कारण पुढे करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे क्लिनिक बंद केले. हे अधिकारी अभद्र बोलल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे व्यथित झाल्याने त्यांनी क्लिनिक बंद करून टाकले. त्यामुळे नाराज झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
- डॉ. प्रज्ञा यांनी दिलेल्या काढ्यामुळे माझ्या घरातील रुग्ण बरे झाले. अनेक रुग्णांचा त्यांनी लाखो रुपयांचा खर्च वाचविला. ऑक्सिजनचे सिलिंडर घेऊन आलेल्या रुग्णांना त्यांनी बरे केले. त्यांच्या औषधांनी रुग्ण बरा होतो, आमचा विश्वास आहे. त्यांचे क्लिनिक सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे हजारो रुग्णांचा जीव वाचेल.
संजय मेंढे, रुग्णाचे नातेवाईक
- मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे. त्याद्वारे मी उपचार करते. माझ्या औषधींचा लोकांना फायदा होतो, असा लोकांचा अनुभव आहे. मी चुकीचे काम करीत नाही. महापालिकेच्या लोकांनी अभद्र बोलणे योग्य नाही. प्रशासनाने मला सहकार्य करावे.
डॉ. प्रज्ञा मेश्राम, आयुर्वेदिक तज्ज्ञ