लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:15 AM2021-03-13T04:15:46+5:302021-03-13T04:15:46+5:30
नागपूर : दि.१५ ते २१ मार्चपर्यंत लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या ...
नागपूर : दि.१५ ते २१ मार्चपर्यंत लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात महापौर दयाशंकर यांना निवेदन दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापारी संघटनांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. मागीलवर्षी सहा महिने लॉकडाऊन राहिल्यामुळे व्यापारी आर्थिक संकटात आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे त्यांचे नुकसान होणार असल्याचे मेहाडिया यांनी सांगितले.
चेंबरचे कोषाध्यक्ष सचिन पुनियानी यांनी, पूर्ण लॉकडाऊन लावण्याऐवजी जे नागरिक, प्रतिष्ठान कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सहसचिव स्वप्निल अहिरकर यांनी, प्रशासन सहा महिन्यांपासून बाजारात सॅनिटायझेशन करीत नसल्याचे सांगितले. यावेळी महापौरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्याचे सांगून, व्यापारी, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
चेंबरच्या निवेदनाला प्रशासनासमोर ठेवून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी चेंबरचे राजेश मुनियार, विनय जैन, कैलास छाबरिया व व्यापारी उपस्थित होते.
....................