नागपुरात जास्त दराने विकल्या गेले रेमडेसिवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:41 AM2020-10-23T11:41:02+5:302020-10-23T11:41:32+5:30
शासनाने ठराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. परंतु कोरोनाच्या भितीचा फायदा घेत कुठे २५०० तर कुठे ५४०० रुपयांत याची विक्री झाल्याचे सामोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांना पहिल्या पाच दिवसांच्या आत रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचा चांगला प्रभाव दिसून येत असल्याचा अनेक डॉक्टरांचा अनुभव आहे. परिणामी, इंजेक्शनची मागणी वाढल्याने तुटवडा पडला. काळाबाजारही वाढला. शासनाने ठराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. परंतु कोरोनाच्या भितीचा फायदा घेत कुठे २५०० तर कुठे ५४०० रुपयांत याची विक्री झाल्याचे सामोर आले आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वेग ऑगस्ट महिन्यापासून वाढला. या महिन्यात २५,२२९ तर सप्टेंबर महिन्यात याच्या दुप्पट, ५२,१५२ नव्या रुग्णांची भर पडली. त्या तुलनेत खासगी हॉस्पिटलच्या खाटा कमी पडल्या. याचा फायदा काही रुग्णालयांनी घेतला. शासकीय दरातील खाटा नसल्याचे सांगून खासगी खाटांवर रुग्णांना भरती केले. काही रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा तुटवडा पुढे करून मुळ किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारली. परंतु बिल मूळ किंमतीचे दिले. तर काहींनी १०० एमजीचे दोन इंजेक्शन ५६०० रुपयांना दिले तर दुसऱ्यांच दिवशी त्याच खासगी हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअर्समधून १०० एमजीचे एक इंजेक्शन ५४०० रुपयांत देण्यात आले. काहींकडे याचे बिल आहेत. मनपा आयुक्त व अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार करणार आहेत. रुग्णालयांच्या बिलासोबतच औषधांचेही ऑडिट करण्याची मागणी बरे झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवार्ईकांकडून होत आहे.
रेमडेसिवीर हे इंजेक्शन तीन वेगवेगळ्या कंपन्या तयार करतात. त्यांचे दरही वेगवेगळे आहे. साधारण २८०० रुपयांपासून ते ५४०० रुपयांपर्यंतचे आहे. यात काही सूट देत असतील तर त्याच्या किंमतीत फरक दिसून येईल. एमआरपी दरापेक्षा जास्त किमतीत या इंजेक्शनची विक्री झाली, याची अद्याप तक्रार नाही.
-पी.एम.बल्लाळ
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन