बुद्ध तत्त्वज्ञानात झालेली भेसळ पाली अभ्यासकांनी दूर करावी : भदंत विमलकित्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:16 PM2019-07-16T22:16:40+5:302019-07-16T22:18:19+5:30
बुद्धाचा धम्म हा तर्कावर, कल्पनांवर अवलंबून नाही. कुठेतरी कर्ताकरविता ईश्वर आहे, हे मानले की गुणवत्ता नष्ट होते. बुद्ध त्यात कुठेही नाहीत. ते मनुष्य आहेत, पण असामान्य. विषय वासना व विकार या सुख प्राप्त करण्याच्या कल्पनांमध्ये मनुष्य आणि देवही गुरफटले आहेत. केवळ बुद्धच या भावनांपासून मुक्त झाले आहेत. बुद्धाच्या मार्गाने गेल्यास कुणीही सुखी होऊ शकतो. मात्र बुद्धानंतर धर्मांध शक्तींनी बुद्धाचे तत्त्वज्ञान कलुषित केले आहे. ही भेसळ दूर करण्यासाठी पाली अभ्यासकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भदंत विमलकित्ती गुणसरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुद्धाचा धम्म हा तर्कावर, कल्पनांवर अवलंबून नाही. कुठेतरी कर्ताकरविता ईश्वर आहे, हे मानले की गुणवत्ता नष्ट होते. बुद्ध त्यात कुठेही नाहीत. ते मनुष्य आहेत, पण असामान्य. विषय वासना व विकार या सुख प्राप्त करण्याच्या कल्पनांमध्ये मनुष्य आणि देवही गुरफटले आहेत. केवळ बुद्धच या भावनांपासून मुक्त झाले आहेत. बुद्धाच्या मार्गाने गेल्यास कुणीही सुखी होऊ शकतो. मात्र बुद्धानंतर धर्मांध शक्तींनी बुद्धाचे तत्त्वज्ञान कलुषित केले आहे. ही भेसळ दूर करण्यासाठी पाली अभ्यासकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भदंत विमलकित्ती गुणसरी यांनी केले.
प्रथम धम्मचक्कपवत्तन दिन आणि धम्मजयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत व बुद्धिस्ट स्टडीज विभाग आणि पाली प्रचारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या सभागृहात आयोजित या एकदिवसीय परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विचारवंत प्रा. सुखदेव थोरात, डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. कृष्णा कांबळे व पाली विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी प्रामुख्याने उपस्थित होते. भदंत गुणसरी म्हणाले, तथागत बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिले धम्मज्ञान याच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दिले होते व तेव्हापासून गुरुपौर्णिमेला महत्त्व असून, या उत्सवाच्या उगमाची सुरुवात बुद्धापासूनच झाली आहे. त्याचा उल्लेख पाली साहित्यात आढळतो. बुद्धानंतरच या साऱ्या संकल्पना पुराणग्रंथांमध्ये आल्या आहेत. मात्र पुढच्या काळात अध्यात्म व तत्त्वज्ञानविषयक गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. बुद्ध कुणाविरोधात बोलत नाहीत. त्यांनी जे सत्य जाणले तेच त्यांनी मांडले आहे. त्यामुळेच त्यांना भगवान म्हणून संबोधण्यात आले. पण पुढच्या काळात भगवानचा ईश्वरीय अपभ्रंश झाला. त्यामुळे अभ्यासकांनी पाली व संस्कृत भाषेचा अभ्यास करून ही भेसळ दूर सारावी व पुन्हा धम्मसंस्कृती रुजविण्यात पुढाकार घ्यावा, अशी भावना भदंत गुणसरी यांनी व्यक्त केली.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संस्कृतएवढेच पाली भाषेचेही महत्त्व असल्याचे मत मांडले. आपण संस्कृत व पाली भाषेचाही अभ्यास केला असल्याचे सांगत बुद्ध तत्त्वज्ञानातील धम्मपदाचे विशेष महत्त्व त्यांनी यावेळी विशद केले. कारागृहाचे अधीक्षक असताना बंदिवानांवर केलेला मेडिटेशनचा प्रयोग आणि धम्माचाच भाग आहे.
बुद्धाचा धम्म मनाशी संबंधित असून एकाच्या मनातून सुरू होऊन दुसऱ्याच्या मनावर संपत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा. सुखदेव थोरात यांनी तथागतांचा उपदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी पाली भाषा जाणणे व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. केवळ भाषा किंवा विषय म्हणून नाही तर तथागत बुद्धाने मांडलेला वेगवेगळा दृष्टिकोन समजण्यासाठी पाली भाषा अभ्यासणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. ज्ञानदित्य शाक्य यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कुमुद मेश्राम यांनी केले तर प्रा. सरोज वानी यांनी आभार मानले.