अल्पवयीन मुलींच्या देहव्यापारातून सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:26 AM2020-12-11T04:26:34+5:302020-12-11T04:26:34+5:30
नागपूर : देहव्यापारामध्ये अडकविलेल्या अल्पवयीन मुलींच्या सुटकेसाठी गुन्हे शाखा आणि लकडगंज पाेलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले. याअंतर्गत गुरुवारी गंगाजमुना वस्तीवर ...
नागपूर : देहव्यापारामध्ये अडकविलेल्या अल्पवयीन मुलींच्या सुटकेसाठी गुन्हे शाखा आणि लकडगंज पाेलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले. याअंतर्गत गुरुवारी गंगाजमुना वस्तीवर धाड घालण्यात आली. दुपारी झालेल्या या कारवाईत १२५ पेक्षा अधिक महिला व पुरुषांना पकडण्यात आले. या महिलांमध्ये १० ते १२ अल्पवयीन मुली असण्याचा संशय आहे. रात्री उशिरापर्यंत अल्पवयीन मुलींचा शाेध घेत लकडगंज स्टेशनमध्ये प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया चालली हाेती.
गंगाजमुना वस्ती कायम देहव्यापार आणि गुन्हेगारांसाठी शरणस्थान म्हणजे ओळख निर्माण झाली आहे. वस्तीमध्ये १०० पेक्षा अधिक देहव्यापाराचे अड्डे आहेत. ग्राहकांकडून अल्पवयीन मुलींची मागणी हाेत असल्याने, अशा मुलींना देहव्यापारात ढकलले जाते. अरुंद गल्ल्या आणि पळण्याचे गुप्त मार्ग असल्याने पाेलिसांना या मुली सापडत नाही. ही स्थिती पाहता गुन्हे शाखेने ऑपरेशन रेस्क्यू राबविले. पाेलिसांनी वस्तीचा नकाशा तयार करून पळण्याचे सर्व मार्ग ब्लाॅक करण्याची याेजना आखली. अधिकऱ्यांसह १२५ पाेलीस कर्मचाऱ्यांना या ऑपरेशनमध्ये तैनात करण्यात आले. दुपारी २ वाजता डीसीपी गजानन राजमाने, लाेहित मतानी यांच्या मार्गदर्शनात लकडगंजचे निरीक्षक पराग पाेटे, गुन्हे शाखेचे विनाेद पाटील, किशाेर पर्वते यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळा समूह बनवून वस्तीवर धाड घातली. अचानक झालेल्या कारवाईने वस्तीमध्ये गाेंधळ उडाला. देहव्यापारात असलेले महिला-पुरुष आणि ग्राहक पळायला लागले. मात्र पाेलिसांच्या घेराबंदीमुळे काही थाेडे पळण्यात यशस्वी झाले.
देहव्यापाराच्या बहुतांश अड्ड्यामध्ये गुप्त तळघर तयार करण्यात आले आहेत. पाेलीस कारवाई हाेताच दरवाजे बंद करून तरुणींना या तळघरात लपविण्यात येते. बहुतेक तळघराला लाेखंडाचे मजबूत दरवाजे आहेत. पाेलिसांनी आदेश देऊनही दरवाजे उघडल्या न गेल्याने पाेलिसांनी ते ताेडणे सुरू केले. सायंकाळपर्यंत बहुतांश दरवाजे ताेडून आराेपींना अटक केली व महिलांना मुक्त करण्यात आले.
गंगाजमुनाच्या ज्या इमारतींमध्ये देहव्यापार चालताे त्यातील बहुतेक बांधकाम अवैध असल्याचे समजते. बहुतेक इमारती नझुलच्या जमिनीवर आहेत. अवैध बांधकाम करून देहव्यापार आणि इतर अपराधिक कार्य केले जाते. पाेलीस कागदपत्रांची तपासणी करून अवैध बांधकाम ताेडण्याची याेजना आखत आहे. राजमाने यांच्या नेतृत्वात आराेपी संताेष आंबेकर व साहिल सय्यद यांचे अवैध बांधकाम ताेडल्याने गुन्हेगारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.