संशोधक संजय वाघ यांचे निधन : ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला दिले होते आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:00 PM2019-05-15T22:00:36+5:302019-05-15T22:37:48+5:30
‘सिरी’चे (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक व प्रसिद्ध संशोधक डॉ.संजय मोरेश्वर वाघ (६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उपराजधानीतील वैज्ञानिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला त्यांनी आव्हान दिले होते व ते सप्रमाण सिद्धदेखील करुन दाखविले होते. त्यांचा जगभरात लौकिक होता हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सिरी’चे (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक व प्रसिद्ध संशोधक डॉ.संजय मोरेश्वर वाघ (६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उपराजधानीतील वैज्ञानिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला त्यांनी आव्हान दिले होते व ते सप्रमाण सिद्धदेखील करुन दाखविले होते. त्यांचा जगभरात लौकिक होता हे विशेष.
डॉ.वाघ यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ होते. नागपुरातूनच विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘फिजिक्स’ व ‘अॅस्ट्रोफिजिक्स’मध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन केले. चांगली नोकरी असताना संशोधनासाठी त्यांनी त्यावर पाणी सोडले. आयुष्यभर त्यांनी संशोधनासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. नागपुरात संशोधनाप्रति जागरुकता वाढावी व विशेषत: शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत याचे महत्त्व पोहोचावे यासाठीदेखील ते प्रयत्नरत होते. यासाठी त्यांनी ‘सिरी’ची स्थापना केली होती. नागपुरात २०१८ साली त्यांच्या पुढाकारातून भौतिक विश्वासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित झाले होते.त्यांच्या निधनामुळे शहरातील संशोधन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे संशोधनासह ते क्रीडाप्रकारातदेखील कुशल होते. रेशीमबाग जिम्नॅस्टिक मंडळाचे ते उपाध्यक्ष होते व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी मल्लखांब स्पर्धादेखील गाजविल्या होत्या.
अखेरपर्यंत संशोधनाचाच विचार
आतादेखील त्यांनी ‘अॅस्ट्रोफिजिक्स’वर काम सुरू केले होते व ‘बेन्डींग ऑफ लाईट’वर संशोधन कार्य अखेरच्या टप्प्यात आले होते. नागपुरात असूनदेखील ते जगभरातील संशोधकांच्या नियमित संपर्कात असायचे. दक्षिण अफ्रिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्वाझुलू-नाताळ’शी तर ‘सिरी’चा सामंजस्य करारच झाला होता व नियमितपणे तेथे शिकवायला जात.
‘आईनस्टाईन’च्या सिद्धांतातील समोर आणल्या त्रुटी
डॉ.संजय वाघ यांनी आपल्या संशोधन ‘पेपर’मधून आईनस्टाईनचा जगप्रसिद्ध विशिष्ट सापेक्षतावाद प्रयोगाच्या निष्कर्षांतील त्रुटी समोर आणल्या होत्या. डॉप्लरचा परिणाम अभ्यासण्यातील चुकीकडे लक्ष वेधत आईनस्टाईनचा जगप्रसिद्ध विशिष्ट सापेक्षतावाद प्रयोगांच्या विपरीत निष्कर्ष देतो, असे त्यांनी सिद्ध केले होते. सापेक्षवादावर लिहिलेल्या ‘सब्टल्टी इन रिलेटीव्हिटी’ या पुस्तकात हे संशोधन सविस्तरपणे मांडले होते. त्यांचे संशोधन जगभरात मान्यता असलेल्या ‘जर्नल्स’मध्येही प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे ‘आईनस्टाईन’ त्यांच्या आदर्शांपैकी एक होते व ते हयात असते तर त्यांनीही आपल्या सिद्धांताचा स्वीकार केला असता, असा विश्वास डॉ. वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला होता.