आशिष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. नोंदणीपूर्व प्रवेश परीक्षा असलेल्या पेटमध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी गुणांची कुठलीही सूट देण्यात आली नाही. त्यामुळे ‘पेट’मध्ये सहभागी झालेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘पेट’चे आयोजन केले होते. १६ सप्टेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ४५ ते ४९ टक्के गुण प्राप्त झाले. यासंबंधात पडताळणी केली असता विद्यापीठाने पीएच.डी.साठी तयार करण्यात आलेल्या २०२१ सालच्या दिशानिर्देशांमध्ये आरक्षित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी वेगळी व्यवस्थाच केली नसल्याची बाब समोर आली.
आरक्षित विद्यार्थ्यांनादेखील सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी ५० टक्के गुणांची अट ठेवण्यात आली. कायद्यानुसार आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पेटमध्ये यशस्वी होण्यासाठी कमीत कमी ४५ टक्के गुणांची अट ठेवायला हवी होती. २०१८ सालच्या दिशानिर्देशांत ही तरतूद होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यासह इतर विद्यापीठांनी आरक्षित प्रवर्गासाठी उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुणांची अट ठेवली. असे असताना नागपूर विद्यापीठाने आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डायरेक्शन ११ ऑफ २०२१ नुसारच निकाल घोषित झाल्याचे स्पष्ट केले.
कुलगुरु म्हणतात, अन्याय नाही
या संदर्भात कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २०२१ सालच्या डायरेक्शन ११ मधील तरतुदी योग्य असल्याचा दावा केला. कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अन्याय झालेला नाही. पेटसाठी अर्ज करण्यासाठी त्यांना गुणांच्या टक्केवारीत सूट देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.