फेरविचार करा, अन्यथा दुकाने उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:28+5:302021-04-08T04:09:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : राज्य शासनाने जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश जारी करताच जीवनावश्यक वस्तू वगळता, संपूर्ण बाजारपेठ मंगळवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : राज्य शासनाने जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश जारी करताच जीवनावश्यक वस्तू वगळता, संपूर्ण बाजारपेठ मंगळवारपासून ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचा हा निर्णय एकतर्फी आणि जोरजबरदस्तीचा असून, यावर व्यापारी चांगलेच संतापले आहेत. शासनाने आम्हा सर्वांवर लादलेले ‘लॉकडाऊन’ असून, या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा आम्ही दुकाने उघडणार, असा इशारा देत बुधवारी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या नावाने निवेदन दिले आहे. उमरेड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रदीप वरपे, नगरपालिकेत मुख्याधिकारी सुवर्णा दखणे आणि उमरेड पोलीस ठाण्यात हे निवेदन सोपविण्यात आले.
प्रारंभी शासनाने शनिवार आणि रविवार असे दोनच दिवस लॉकडाऊनचे जाहीर केले होते. अशातच अचानकपणे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा आदेश निघाला. नियमावलीचा विचार करता, बहुतांश दुकाने अत्यावश्यक सेवेत मोडतात. अशावेळी नागरिकांच्या गर्दीवरही फारसा अंकुश दिसून येत नाही. शासकीय कार्यालये, बससेवा, रेल्वे, ट्रान्सपोर्ट आदी सर्व सेवा सुरळीत आहेत. जनतेलासुद्धा घराबाहेर सहज पडता येते. लग्नसमारंभही सुरळीत सुरू आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना, उरलेल्या आम्हा व्यापाऱ्यांमुळेच कोरोना पसरतो काय, असा सवालही निवेदनात करण्यात आला आहे.
दुकानावर सरासरी १० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. आमचीच आमदनी बंद पडल्यास नाेकरांची मजुरी द्यायची कशी, अशी कैफीयतसुद्धा मांडण्यात आली. मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या फटक्यातून आम्ही आता कुठे सावरलोत. अशावेळी पुन्हा लॉकडाऊनचा आघात जनहितार्थ नाही. सर्वांना कडक आणि कठोर निर्बंध लावावेत, आम्ही त्याचे पालन करू. तेव्हा या संपूर्ण निर्णयावर फेरविचार करावा, अन्यथा आम्ही आपली दुकाने उघडू, असा इशारा व्यापाऱ्यांनी देत आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी सुधाकर खानोरकर, घनश्याम सारडा, चंद्रशेखर अग्रवाल, अनंता अड्याळवाले, जगदीश हरडे, संजय सारडा, अमित चावला, संजय सहजरामानी, संजय मुंधडा, गोविंद सहजरामानी, संजय गुप्ता, रवि सहजरामानी, विकेश पटेल, संजय वांदिले आदी उपस्थित होते.