ग्राहकाचे १.२५ लाख रुपये १० टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:26+5:302021-03-04T04:14:26+5:30

नागपूर : मृत ग्राहक रमेश श्रीवास यांच्या वारसदारांना, भूखंड विक्री व्यवहारांतर्गत स्वीकारलेले १ लाख २५ हजार रुपये १० टक्के ...

Return Rs. 1.25 lakh to the customer with 10% interest | ग्राहकाचे १.२५ लाख रुपये १० टक्के व्याजासह परत करा

ग्राहकाचे १.२५ लाख रुपये १० टक्के व्याजासह परत करा

Next

नागपूर : मृत ग्राहक रमेश श्रीवास यांच्या वारसदारांना, भूखंड विक्री व्यवहारांतर्गत स्वीकारलेले १ लाख २५ हजार रुपये १० टक्के व्याजासह परत करा. तसेच, त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई द्या, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भक्तिधाम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर भीमराव बांगडे यांना दिले आहेत.

प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित व्याज ११ एप्रिल २०१० ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी बांगडे यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. प्रकरणातील माहितीनुसार, रमेश श्रीवास यांनी भक्तिधाम डेव्हलपर्सच्या मौजा ठाणा, ता. उमरेड येथील ले-आऊटमध्ये २ लाख ८२ हजार ५०० रुपयात एक भूखंड खरेदी करण्यासाठी ११ एप्रिल २०१० रोजी करार केला. तसेच, त्याच दिवशी डेव्हलपरला १ लाख २५ हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम १० एप्रिल २०१२ पर्यंत अदा करण्याचे व त्यानंतर विक्रीपत्र नोंदविण्याचे ठरले होते. दरम्यान, ले-आऊटच्या जमिनीचे विक्रीपत्र झाले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीवास यांनी डेव्हलपरला पैसे परत मागितले. परंतु, डेव्हलपरने त्यांना भूखंडाचे विक्रीपत्र करून दिले नाही व पैसेही परत केले नाही. पुढे ५ जानेवारी २०१६ रोजी श्रीवास यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वारसदारांनी डेव्हलपरविरुद्ध आयोगात तक्रार दाखल केली. त्यात डेव्हलपरने लेखी उत्तर दाखल करून विविध मुद्यांच्या आधारे तक्रारकर्त्यांचे आरोप फेटाळून लावले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून सदर आदेश दिले.

------------------

डेव्हलपरने स्वत:ची बाजू सिद्ध केली नाही

डेव्हलपरने तक्रारीतील सर्व कथन अमान्‍य केले आहे. पण स्वत:चे म्‍हणणे सिद्ध करण्‍याकरिता कोणतेही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केले नाही, असे आयोगाने निर्णयात नमूद केले. तक्रारकर्त्यांनी भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून देण्‍याकरिता अनेकदा विनंती केली. परंतु, डेव्हलपरने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, त्‍यांच्‍याकडून घेतलेली रक्‍कमही परत केली नाही. ही कृती डेव्हलपरच्या सेवेतील त्रुटी आहे. डेव्हलपरने ग्राहकासोबत अनुचित व्‍यापार पद्धदतीचा अवलंब केल्‍याचे दिसून येते, असे मतही आयोगाने व्यक्त केेले.

Web Title: Return Rs. 1.25 lakh to the customer with 10% interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.