मुदत ठेवी व्याजासह परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:11+5:302021-06-28T04:07:11+5:30
नागपूर : तक्रारकर्ते खुशाल व मंदाकिनी गेडाम या दाम्पत्याच्या मुदत ठेवी व्याजासह परत करण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण ...
नागपूर : तक्रारकर्ते खुशाल व मंदाकिनी गेडाम या दाम्पत्याच्या मुदत ठेवी व्याजासह परत करण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेला दिला. तसेच, गेडाम दाम्पत्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम पतसंस्थेनेच द्यायची आहे.
संबंधित तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्या पीठाने निर्णय दिला. खुशाल गेडाम यांची २ लाख रुपयाची मुदत ठेव १७ फेब्रुवारी २०१७ पासून १२ टक्के व्याजासह तर, मंदाकिनी गेडाम यांच्या प्रत्येकी १ लाख रुपयाच्या दोन मुदत ठेवीपैकी एक ठेव २७ फेब्रुवारी २०१७ पासून व दुसरी ठेव २० एप्रिल २०१७ पासून १२ टक्के व्याजासह आणि प्रत्येकी ३ लाख रुपयाच्या दोन मुदत ठेवीपैकी एक ठेव ५ जुलै २०१८ पासून ११ टक्के व्याजासह व दुसरी ठेव २५ जुलै २०१८ पासून १०.५ टक्के व्याजासह परत करावी असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पतसंस्थेला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. पतसंस्थेत कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे गेडाम दाम्पत्याने ठेवींची रक्कम परत मिळवण्यासाठी ही तक्रार दाखल केली होती.