लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तृतीय श्रेणी महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूसह तहसील कार्यालयातील कामे ठप्प पडली. जात, उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रमाणपत्रांची कामे रखडली. यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडाला. परंतु याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला.महसूल कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून राज्यभरात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपाचे पडसाद नागपूर जिल्ह्यातही पहावयास मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह तालुका स्तरावरील सर्व महसूल कार्यालयात आज शुकशुकाट होता. याशिवाय तहसील, सेतू कार्यालयातील अनेक सेवा आज बंद होत्या. नागरिकांना रहिवासी, जात, उत्पन्न आदी दाखले मिळाले नाही. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक सेवांवर परिणाम झाला. अधिकाऱ्यांनाही काम करणे अडचणीचे झाले. त्यामुळे फाईली निकाली निघण्याचे प्रमाण मंदावले होते. या सर्वांमुळे सामान्य नागरिकांना फटका बसला.प्रत्येक तालुक्यात खनिकर्म निरीक्षक हे अव्वल कारकून दर्जाचे पद निर्माण करावे, विभागाअंतर्गत जिल्हा बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना द्यावे, सहाव्या वेतन आयोगानुसार नायब तहसीलदारास ग्रेड पे मिळावा, २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही महसूल कर्मचारी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. शासनाच्यावतीने यातील अनेक मागण्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मागण्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारला आहे. तसा इशारा त्यांनी पूर्वीच दिलेला होता.जोवर मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णय निर्गमित होत नाही, तोवर हा संप सुरूच राहणार असल्याचे जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राज ढोमणे यांनी सांगितले.संपात जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदोडकर, सरचिटणीस राज ढोमणे, पी. वाडीभस्मे, ए. महल्ले, विनोद शेंभेकर, हरीश कोहाड, दिनेश तिजारे, सतीश सूर्यवंशी, स्नेहल खवले, अभिषेक हिवसे, एस. चरडे, रसिका झंझाळ, पी.बावस्कर, टी. कावडकर, व्ही. खारोडे, प्रमोद वराडे, प्रशांत झाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सहभागी होते.