दर प्रिंट नसल्याने नागपुरात १.६६ लाखांचे तांदूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:53 AM2020-04-02T00:53:00+5:302020-04-02T00:54:29+5:30
कळमना बाजारात दोन दुकानातून २५ किलोच्या तांदळाच्या पोत्यावर दराचे प्रिंट नसल्याने १.६६ लाख रुपयांचा तांदूळ जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान काळाबाजार आणि साठेबाजीच्या तक्रारी वाढल्यानंतर संबंधित विभाग सक्रिय झाला आहे. वैधमापनशास्त्र विभागाने मास्क आणि सॅनिटायझरची ठराविक पेक्षा जास्त दरात विक्री केल्याची आठ प्रकरणे नोंदविली आहेत. याशिवाय कळमना बाजारात दोन दुकानातून २५ किलोच्या तांदळाच्या पोत्यावर दराचे प्रिंट नसल्याने १.६६ लाख रुपयांचा तांदूळ जप्त केला आहे.
तसे पाहता तक्रारींच्या तुलनेत कारवाईची संख्या फारच कमी आहे. याच कारणामुळे नफाखोरी करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. अनेक व्यापारी ९० रुपये लिटरचे सोयाबीन तेल ११० ते १२० रुपयांत विकत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक व्यापारी भविष्यात जीवनावश्यक मालाचा तुटवडा होणार असल्याची सूचना ग्राहकांना देत आहेत. अखेर व्यापाऱ्यांची हिंमत का वाढत आहे, याचे कारण अनभिज्ञ आहे. पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अधिकारी कारवाई करीत नसल्याने साठेबाजी आणि नफाखोरीला बळ मिळत आहे. या प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यांच्यात कुठलाही ताळमेळ नाही. कुठल्याही संदर्भात एका विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला तर ते दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव सांगून जबाबदारी ढकलत आहेत. वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसंदर्भात ज्या प्रकारे कारवाई करून दंड वसूल केला होता, त्यानुसार सर्व विभागाने एकत्रितरीत्या साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
काय म्हणतात अधिकारी
वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक धनवंत कोवे म्हणाले, पॅकेट आणि सहा डिक्लेरेशन (प्रिंटेड रेट, वजन, उत्पादकाचे नाव, तारीख) आदी वस्तूंवर विभाग काम करते. जर ग्राहकाला बिलावर ठरावित किमतीपेक्षा जास्त दर आढळून आल्यास तो विभागाचा व्हॉट्सअॅप क्रमांक ९४०४९५१८२८ यावर तक्रार करू शकतो. अशा स्थितीत प्रकरणाची त्वरित नोंद होते. स्टॉकशी जुळलेली प्रकरणे विभागाकडे येत नाहीत तर खुल्या खाद्य सामग्रीच्या दरात फरक असल्याची प्रकरणे अन्न विभागाशी संबंधित असतात. स्टॉकसंदर्भात अन्न पुरवठा अधिकारी-२ अनिल सवाई म्हणाले, सध्या कमी स्टॉकसंदर्भात कारवाई झालेली नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अभय देशमुख म्हणाले, तक्रारीनुसार कारवाई करण्यात येत आहे. औषधासंदर्भातील प्रकरणांमध्ये कारवाईसाठी वेगळे कलम आहेत.
विश्वास वाढविण्याची संधी
या संकटसमयी बहुतांश नागरिक मोहल्ल्यातील किराणा दुकानातून खरेदी करीत आहेत. दरामधील अंतर पाहून ऑनलाईन शॉपिंगला जास्त पसंती देत आहे. अशा स्थिती किराणा दुकानदारांना ग्राहकांचा विश्वास संपादन करायचा आहे. पण साठेबाजांना याचे काहीही औचित्य नसून ते मनमानी करीत आहेत. वैधमापनशास्त्र विभाग, अन्न पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित काम केल्यास अनुचित घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य होऊन साठेबाजी करणाऱ्यांवर आळा बसणार आहे.