स्क्रीन टाइम वाढल्याने ‘किडनी स्टोन’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 07:00 AM2022-05-22T07:00:00+5:302022-05-22T07:00:01+5:30
Nagpur News मूत्ररोग तज्ज्ञांच्या मते, मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर तास न् तास घालविला जात असल्याने अनेकांना पाणी पिण्याचे भानच राहत नाही. परिणामी, ‘डिहायड्रेशन’ होऊन त्याचा प्रभाव मूत्रपिंडावर पडतो.
सुमेध वाघमारे
नागपूर : लहानांपासून ते मोठ्यांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. मूत्ररोग तज्ज्ञांच्या मते, मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर तास न् तास घालविला जात असल्याने अनेकांना पाणी पिण्याचे भानच राहत नाही. परिणामी, ‘डिहायड्रेशन’ होऊन त्याचा प्रभाव मूत्रपिंडावर पडतो. यामुळे ‘किडनी स्टोन’ म्हणजे मूतखड्याची समस्या केवळ प्रौढातच नाही तर लहान मुलातही वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जगात दरवर्षी मूत्रपिंड (किडनी) विकाराचे १५ लाखांवर नवे रुग्ण आढळून येतात. भारतात याचे प्रमाण दोन ते तीन लाख आहे. मधुमेहामुळे १०० मधून जवळपास ३३ रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार होतो. यावरील उपचार अत्यंत महागडे आहेत. त्यामुळे मूत्रविकार होऊच नये, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
- कमी पाणी पिल्याने मूत्रविकार - डॉ. कोलते
मूत्ररोग शल्यचिकित्सक व किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजय कोलते म्हणाले, अयोग्य जीवनशैलीचा मूत्रपिंडावर मोठा परिणाम होतो. शिवाय, अलीकडे वाढलेल्या ‘स्क्रीन टाइम’मुळे पाणी कमी प्यायले जाते. त्याचा प्रभाव मूत्रपिंडावर होतो. यातून किडनी स्टोन व इतरही आजार होण्याची शक्यता असते.
- फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्सही ठरतेय कारण - डॉ. आचार्य
नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शिवनारायण आचार्य म्हणाले, मुलांमध्ये मसालेदार फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातुलनेत मुलांच्या शारीरिक श्रमाचे प्रमाण कमी झाले आहे. अयोग्य जीवनशैलीमुळे मुलांच्या शरीरातले मीठ व स्थुलतेचे प्रमाण वाढत असल्याने त्यांच्यातदेखील किडनीचे आजार बळावत आहेत.
- १० लाख मुलांमध्ये १०० मुलांना मूत्रपिंडाचा विकार - डॉ. सारडा
बालमूत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. दिनेश सारडा म्हणाले, लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या विकारामध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. दहा लाख मुलांच्या मागे १०० लहान मुले ही मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन विकाराने (सीकेडी) ग्रस्त असतात. त्यापैकी दोनतृतीयांश मुलांना जन्मत: किडनी, मूत्रमार्गाची विकृती व विकार असतात. यामुळे लक्षणे दिसताच उपचार करणे गरजेचे आहे.
:: किडनी आजाराची काही लक्षणे
- चेहरा आणि पायावर सूज येणे
- भूक कमी लागणे
- लवकर थकणे
- अति रक्तदाब
- रक्ताची कमी
:: असे ठेवा किडनीला निरोगी
-कमी मात्रेत मिठाचे सेवन करा
- योग्य प्रमाणात पाणी प्या
- नियमित व्यायाम करा
- जेवणाच्या वेळा पाळा
- तणावाला दूर ठेवा
- रक्तदाब व मधुमेहाला नियंत्रित ठेवा
- धूम्रपान बंद करा.
- स्वत:हून औषधे घेऊ नका