लोकमत ऑन द स्पॉट
नागपूर : महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनच्या (एमआरआयडीसी) वतीने मोमिनपुरा मार्गावरील ओव्हरब्रीजचे काम सुरू आहे. शनिवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी मोतिबाग रेल्वे क्रॉसिंग मार्गावर भव्य डोम तयार करण्यात येत आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे डोम तयार करण्यासाठी ‘एमआरआयडीसी’ने सहा दिवसांपूर्वी मोतिबाग रेल्वे क्रॉसिंग ते कडबी चौक हा रस्ता बंद केला असून त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली आहे.
मागील सहा दिवसांपासून मोतिबाग रेल्वे क्रॉसिंग ते कडबी चौक हा मार्ग बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. मार्ग बंद केल्यानंतर एमआरआयडीसीने येथे रस्ता वळविल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही. वाहनचालकांना कोणत्या मार्गाने जायचे आहे त्याची दिशा दर्शविणारा फलकही येथे लावण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत वाहतूक विभागाला सूचना दिली काय, अशी विचारणा केली असता, वाहतूक विभागानेच मार्ग बंद केल्याचे सांगण्यात आले. ओव्हरब्रीजच्या प्रकल्पाबाबत विचारणा केली असता, माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. उल्लेखनीय म्हणजे मध्य आणि उत्तर नागपूरला जोडण्याशिवाय जवळच रेल्वे स्टेशन, संत्रा मार्केट, मेयो हॉस्पिटलसह मोमिनपुरा मार्केट असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हा मार्ग थेट कामठी रोडवर जातो. मार्ग बंद असल्यामुळे वाहनचालकांना मोतिबाग रेल्वे कॉलनीतील अंतर्गत रस्त्याने जावे लागत आहे. परंतु रस्ता वळविल्याचा फलक न लावल्यामुळे ज्यांना मोतिबाग कॉलनीतील अंतर्गत रस्ता माहीत नाही, असे अनेक नागरिक परत मोमिनपुराकडे जात आहेत. यामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. कोणत्या मार्गाने जावे हे नागरिकांना सुचत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बेजबाबदारपणाबद्दल महापालिकाही अनभिज्ञ आहे. मागील काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली आहे. परंतु कोणीच याकडे लक्ष देत नसल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.
...............