‘जिंदगी’च्या ट्रॅकवर निनादला ‘प्यार का गीत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:32 PM2018-03-07T23:32:44+5:302018-03-07T23:33:01+5:30
उषा खन्ना यांना लाईव्ह ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक किस्स्यागणिक ६० च्या दशकातील रुपेरी जगताचा सोनेरी पट जसाचा तसा श्रोत्यांसमोर उभा राहिला. निमित्त होते लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ या कार्यक्रमाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उषा खन्ना, एक असे नाव ज्यांनी चित्रपट संगीतकारांचा एकछत्री अमल असलेल्या राज्यात आपल्या प्रतिभेने स्वत:ची केवळ वेगळी ओळखच बनवली नाही तर थेट हृदयातून प्रसवलेल्या चालीद्वारे शेकडो गाण्यांना अजरामर करून टाकले. अशा सुरेल प्रतिभेच्या धनी असलेल्या उषा खन्ना यांना लाईव्ह ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक किस्स्यागणिक ६० च्या दशकातील रुपेरी जगताचा सोनेरी पट जसाचा तसा श्रोत्यांसमोर उभा राहिला. निमित्त होते लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ या कार्यक्रमाचे. बुधवारी सायंकाळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. जागतिक महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनाली हिवरकर, माया अग्ने, मनोरमा फुके, डॉ. सुभाष मेश्राम, डॉ. हेमंत सोनारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. ‘अल्लाह करम करना...’ या गीताने पुण्याहून आलेल्या मनिषा लताड यांनी या मैफिलीचा आगाज केला. ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ हे टायटल साँगही त्यांनी सुरेल गायले. ज्योतीरामन अय्यर यांनी ‘दिल देके देखो...’ हे गाणे अतिशय जोशात सादर केले. अरविंद पाटील यांच्या ‘छोडो कल की बाते...’ या गीताने श्रोत्यांना फ्लॅश बॅकमध्ये नेले. ‘तेरे गलियो मे ना रखेंगे कदम...’ या संजय पोटदुखे यांच्या गीताने मस्त ‘समा’ बांधला. सागर मधुमटके आणि आकांक्षा नगरकर यांनी ‘प्यार करते हैं हम...’ हे युगुल गीत सुंदर गायले. सागरच्या संगतीने मनिषा लताड यांनी सादर केलेले ‘चाँद के पास जो किनारा हैं...’ या गाण्याला श्रोत्यांचा वन्समोअर मिळाला. पार्वती नायर यांनी उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेले मल्याळम गीत सादर केले. उद्घाटनीय सत्राचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. हार्मोनी इव्हेंटस्चे संचालक राजेश समर्थ यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात की-बोर्डवर राजा राठोड, परिमल जोशी, गिटार- प्रकाश चव्हाण, बेस गिटार- रिंकू निखारे, आॅक्टोपॅड-नंदू गोहणे, ढोलक- पंकज यादव, तबला- अशोक तोकलवार, तुंबा कांगो-राजेश धामणकर तर तालवाद्यावर उज्ज्वला गोकर्ण यांनी सुरेल सहसंगत केली.
संगीत छंद नव्हे तपश्चर्या
काही लोक म्हणतात मला गायनाचा छंद आहे. पण, छंद चांगले खाण्याचा असू शकतो गायनाचा नाही. संगीतासाठी तपश्चर्या हवी असते, अशा शब्दात उषा खन्ना यांनी श्रोत्यांशी संवादाचा प्रारंभ केला. माझे काका नागपूरचे असल्याने या शहराशी एक वेगळेच भावनिक नाते असल्याचे त्यांनी सांगितले. त्या या क्षेत्रात कशा आल्या, एक स्त्री म्हणून त्यांना किती संघर्ष करावा लागला, यश-अपयशाची स्थित्यंतरे त्यांनी कशी पचवली, असे पूर्वायुष्यातील अनेक अनुभव त्यांनी श्रोत्यांना सांगितले. श्वेता शेलगांवकर यांनी त्यांना बोलते केले. यावेळी मंचावर शास्त्रीय गायिका कल्याणी मित्रा उपस्थित होत्या.