लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलिकडच्या काळात अर्धांगवायू (पॅरालिसिस), ‘स्ट्रोक’, ‘स्पायनल इन्जुरी’, ‘ब्रेन इन्जुरी’चे प्रमाण वाढले आहे. यावर अद्ययावत उपचार करून जीवाचा धोका कमी केला जाऊ शकतो. परंतु यातून येणाऱ्या अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. या यंत्रामुळे खाटेवरील रुग्णाकडूनही ‘फिजीओथेरपी’करून घेऊन त्यांच्या हातापायात ताकद परत मिळवून देणे शक्य झाले आहे, अशी माहिती प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. गिरी व डॉ. पाखमोडे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ‘पॅरालिसिस’, ‘स्ट्रोक’, ‘स्पायनल इन्जुरी’, ‘ब्रेन इन्जुरी’चे तीन लाख ५३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ३० हजार रुग्णांना रुग्णालात दाखल करून उपचार करण्यात आले. यातील १३ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हा आकडा एकट्या ‘न्युरॉन’ हॉस्पिटलचा आहे. यावरून असे रुग्ण किती मोठ्या संख्येत असतील यातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, यातून येणारे अपंगत्व ही एक मोठी समस्या आहे. यावर पारंपरिक ‘फिजीओथेरपी’ आहे. रुग्णांना त्याचा फायदाही होतो. परंतु यात बराच कालावधी लागतो. यामुळे अनेक रुग्ण तोचतोच व्यायाम करून कंटाळून सोडून देतात. यामुळे अपंगत्व कमी होण्यापेक्षा बळावते. अशा रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अद्ययावत ‘होकोमा’ ही ‘रोबोटिक’ यंत्रणा उभी करण्यात आली. यातील ‘लोकोमॅट’ हे उपकरण खाटेवर असलेल्या रुग्णाला जमिनीपासून काही अंतरावर अलगद उचलते. रुग्णाकडून चालण्याचा व्यायामापासून तर इतरही महत्त्वाचे व्यायाम करून घेते.‘आर्मिओ स्प्रिंग’ या रोबोटिक यंत्रामुळे हाताची ताकद तर ‘इरिगो’ यंत्रामुळे पायाची ताकद परत येण्यास मदत होते. ‘अॅण्डीगो’ रोबोटिक यंत्रामुळे चालण्याचा व्यायाम करून पडण्याची भीती दूर केली जाते. विशेष म्हणजे, हे चारही रोबोटिक यंत्र प्रत्येक व्यायामाच्यावेळी एक ‘टास्क’ देऊन रुग्णांकडून ते करवून घेते. यामुळे रुग्णाला त्यातून आनंदासोबतच एक आत्मविश्वास निर्माण करतो. परिणामी, रुग्ण लवकर बरा होतो. रोजच्या दैनंदिन कार्यासाठी दुसऱ्यावर विसंबून राहत नाही. खाटेवर असलेल्या रुग्णांसाठी ही अद्ययावत यंत्रणा वरदान ठरणारी आहे, असेही ते म्हणाले.
रोबोटिक तंत्रज्ञानाने खाटेवरील रुग्णांचे पुनर्वसन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 9:46 PM
अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे.
ठळक मुद्देमध्यभारतात पहिल्यांदाच तंत्रज्ञान