खोली एक आणि वर्ग १ ते ५ : चार वर्षांपासून उघड्यावर भरते शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:00 PM2018-12-28T23:00:50+5:302018-12-28T23:04:17+5:30
पंचायत समिती उमरेड येथील चिमणाझरी जि.प. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग आहे. या पाचही वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच वर्गखोली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही शाळा उघड्यावर भरत आहे. चिमणाझरीच्या या शाळेही अवस्था बघून १५००च्या वर शाळेचा डोलारा शिक्षण विभाग कसा सांभाळत असेल, सर्वसामान्यांपुढे पडलेले हे एक कोडेच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंचायत समिती उमरेड येथील चिमणाझरी जि.प. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग आहे. या पाचही वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच वर्गखोली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही शाळा उघड्यावर भरत आहे. चिमणाझरीच्या या शाळेही अवस्था बघून १५००च्या वर शाळेचा डोलारा शिक्षण विभाग कसा सांभाळत असेल, सर्वसामान्यांपुढे पडलेले हे एक कोडेच आहे.
शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याचा आटापिटा शिक्षण विभाग करीत आहे. पण शिकण्याकरिता विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत अर्थात वर्गखोलीचीही गरज असते. शहरापासून अगदी १५ किमी अंतरावर असणाऱ्या उमरेड तालुक्यातील चिमणाझरी गावातील जि.प.ची शाळा एकाच वर्गखोलीत भरत आहे.
५००च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात जास्तीत जास्त लोकसंख्या आदिवासी लोकांची आहे. या शाळेत वर्ग १ ते ५ साठी २ शिक्षक कार्यरत आहे. शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने बांधकाम विभागाच्या आदेशाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ती पाडण्यात आली होती. त्याचवेळी नवीन वर्गखोली मंजूर करून ती त्वरित बांधण्यात येईल असे अधिकऱ्यांकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात चार वर्षे उलटून गेली, नवीन इमारत बांधून पूर्ण होणे तर सोडाच इमारत अद्याप मंजूर सुद्धा झालेली नाही.
सर्वशिक्षा अभियान अंतर्गत वर्गखोली बांधून देण्याची मागणी जि.प कडे करण्यात आली आहे. गावकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जिल्हा नियोजन व विकास समितीमध्ये वर्गखोली मंजूर व्हावी यासाठीही प्रयत्न केले गेले परंतु तेथेही गरिबांच्या या लेकरांची कणव कुणाला आली नाही.
गेली चार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत हे विद्यार्थी कधी उघड्या मैदानात तर कधी झाडाखाली तर कधी भिंतीच्या आडोशाला बसून शिकत आहेत. प्रशासनात काहीही चालत नसलेले शिक्षक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत उद्याच्या भारताचे भविष्य झाडाच्या खाली तर भिंतीच्या आड उघड्यावर निरभ्र आकाशाखाली घडवत आहे.
विद्यार्थी हित लक्षात घेता जि.प.प्राथमिक शाळा चिमणाझरी येथे लवकरात लवकर वर्गखोली बांधकाम करण्यात यावे अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास भोयर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वलिदास उघडे, प्रीती फटिंग, बाळाराम राऊत, सिद्धार्थ गणवीर, ग्राम पंचायत सदस्य यमुबाई ढोक व पालकांनी व्यक्त केली आहे.