लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावाला राखी बांधून गोंदियावरून आलेली एक महिला गाडीखाली उतरताना अस्वस्थ वाटून अचानक बेशुद्ध झाली. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान आणि महिला कॉन्स्टेबलने कृत्रीम श्वासोच्छवास देऊन या महिलेचे प्राण वाचविले. ही घटना नागपूररेल्वेस्थानकावर रविवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या दरम्यान घडली.ममता टेंभरे (४०) रा. महादुला, कोराडी असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्षा बंधनानिमित्त त्या गोंदियाला असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या. रविवारी १२१०६ गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने त्या नागपुरात आल्या. त्यांच्या सोबत दोन बहिणी, दोन मुले आणि नातेवाईक होते. त्या महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करीत होत्या. या गाडीत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची एकच गर्दी झाली. अशातच ममता घामाघूम झाल्या. त्यांना श्वास घेता येत नव्हता. समोरचे काहीच दिसेनासे झाले. शरीरही थंड पडायला लागले. नातेवाईकांनी लगेच प्लॅटफार्मवर झोपविले. दरम्यान आरपीएफच्या महिला आरक्षक निता माजी, आरक्षक ब्रिजभूषण यादव, सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव, सुषमा ढोमणे आणि कामसिंग ठाकूर हे कर्तव्यावर असताना त्यांना गर्दी दिसली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रवाशांना बाजूला हटविले. निता माजी यांनी महिलेची स्थिती पाहुन तिला तोंडाने कृत्रीम श्वास दिला. तर त्यांच्या मुलांनी हार्ट पंपींग केली. आरपीएफ महिला कॉन्स्टेबल सुषमा ढोमणे यांनी ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. बॅटरी कार चालकाला बोलाविण्यात आले. कॉन्स्टेबल महेश गिरी यांनी उपस्टेशन व्यवस्थापकांना सांगून रेल्वे डॉक्टरची व्यवस्था केली. बॅटरी कार पोहोचल्यानंतर ममता टेंभरे यांना लगेच बॅटरी कारने प्लॅटफार्म क्रमांक १ वर आणण्यात आले. रेल्वे डॉक्टरांनी तपासल्यानंतर या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.
आरपीएफ जवानाने वाचविले महिला प्रवाशाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:48 AM