नागपूर : अवघ्या १५ महिन्याचा विहान, ज्याने मनाप्रमाणे जगही पाहिले नाही. अन एका माेठ्या जीवघेण्या आजाराने त्याला विळख्यात घेतले. एका उपचाराने ताे बरा हाेऊ शकतो पण त्याचा खर्च आवाक्याबाहेर आहे. अगदी डाॅक्टर असलेल्या वडिलांच्याही आवाक्याबाहेर. तब्बल १६ काेटी रुपये. मात्र काळजाच्या तुकड्याला वाचविण्यासाठी आईवडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. समाजातील संवेदनशील लाेकांनाही त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
विहान अकुलवार या १५ महिन्याच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर अॅट्राफी (एसएमए) या दुर्मिळ आजाराचे निदान झाले आहे. या आजारावर उपचार तर हाेताे पण अतिशय महाग आहे. ‘झाेलगेन्स्मा’ जीन रिप्लेसमेंट थेरेपी हा एकमेव उपचार आहे आणि त्याचा खर्च १६ काेटी रुपये आहे. मात्र लवकर उपचार केला तरच ते लाभदायक ठरणार असून विहानकडे औषधाेपचारासाठी आता काही महिन्याचा अवधी शिल्लक आहे.
विहानचे वडील डाॅ. विक्रांत अकुलवार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवारत आहेत. मात्र मुलाच्या आजाराने निराशेत गेलेल्या पालकानी संवेदनशील लाेकांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी इम्पॅक्ट गुरु प्लॅटफार्मवर मदतीचे आवाहन केले हाेते आणि त्यातून २.५ काेटी रुपये गाेळा करणे शक्य झाले आहे. ही थाेडीथाेडकी रक्कम नसली तरी एकूण खर्चाचा विचार करता अतिशय ताेकडी आहे. त्यामुळे जनतेकडूनच सहकार्याची गरज वडिलांनी व्यक्त केली. देशात यापूर्वी काही मुलांना हा आजार झाला हाेता व जनसहकार्यामुळे त्यांच्यावर उपचारखर्च करणे शक्य झाले.
साेशल मीडियावरही मदतीसाठी कॅम्पेन चालविले असून अभिनेता अभिषेक बच्चन, मनाेज वाजपेयी यांच्यासारख्या कलावंतांनी सहकार्य दाखविले आहे. मात्र अद्याप आम्ही लक्ष्यापासून दूर असल्याचे सांगत यावेळी छाेटी, माेठी सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विहानच्या पायाला अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास आणि मदतीशिवाय बसणे, उठणे हाेत नाही. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू झाल्यानंतरच काही बरे हाेण्याची शक्यता वडिलांनी व्यक्त केली. विहानबाबत अधिक माहितीसाठी डाॅ. विक्रांत यांच्या -०७७९८३५५७७७ या क्रमांकावर संपर्क करू शकता.
अशी करा मदत
- खातेधारकाचे नाव : विहान अकुलवार
- आयसीआयसीआय बॅंकेचा खाते क्रमांक : 90923105797251
- आएफएससी काेड : आयडीएफबी००२०१०१
- युपीआय ट्रान्झॅक्शन : assist.vihaan19@icici