राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का?
By योगेश पांडे | Published: December 14, 2023 11:00 PM2023-12-14T23:00:03+5:302023-12-14T23:05:42+5:30
१९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील विजयानंतर भाजप आमदारांमध्ये उत्साह असून आता देशपातळीवर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या मंत्री-आमदारांना संघातर्फे विशेष ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. १९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१४ मधील सत्ताबदलानंतर संघातर्फे अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार व मंत्र्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यावर भर असतो. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपूरात आले आहेत. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनभाजपाच्या सर्व मंत्री व आमदारासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजपचे सर्व मंत्री व आमदार उपस्थित राहतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. यंदा संघाकडून नेमके कोण पदाधिकारी मार्गदर्शन करणार याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. भाजपच्या एका वरिष्ठ आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर मंगळवारीच रेशीमबागेत भेट असल्याची माहिती दिली. दरम्यान, महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्यदेखील रेशीमबागेत जाणार का याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.
- जनतेमध्ये जाण्याच्या सूचना
२०२४ च्या निवडणूकांना फार कालावधी राहिलेला नाही. अशा स्थितीत जनप्रतिनिधींनी जनतेमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने काम केले पाहिजे, असे संघाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. यासंदर्भातच संघाकडून आमदारांशी संवाद साधण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोबतच भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनताहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे.