नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या ऑफलाईनच होतील. यासंदर्भात शुक्रवारी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू राहतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्येच परीक्षा द्यावी लागेल, असा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला.
बैठकीनंतर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापण मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी एक व्हिडिओ जारी करून केवळ इतकेच सांगितले की, परीक्षा ऑफलाइन होतील. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप हे बहुपर्यायी राहील. प्रश्नपत्रिकेत ५० प्रश्न राहतील. विद्यार्थ्यांना ४० प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतील. यासाठी त्यांना ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जारी केले जाईल.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जेव्हा दहावी व बारावीच्या परीक्षा या लेखी होत आहेत, विविध स्पर्धा परीक्षाही केंद्रांवर होत आहेत अशा परिस्थितीत विद्यापीठाने होम सेंटर परीक्षा घेण्याचा निर्णय कसा घेतला? अनेक विद्यालयांमध्ये शिक्षक नाहीत, कायमस्वरूपी प्राचार्य नाहीत. तिथे नियमित व योग्यपणे परीक्षेची जबाबदारी कोण घेणार? सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेत ‘कॉपी’ कोण रोखणार? या सर्व बाबी विद्यापीठ प्रशासनाला माहिती असतानाही असा निर्णय कसा काय घेतला, असा प्रश्न विचारला जात आहे.
ऑनलाइन परीक्षेत मोठ्या प्रमाणावर झाली ‘कॉपी’
कोरोना संक्रमण काळात विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेतली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर ‘कॉपी’ झाली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षकांनी सोडवून दिले तर काहींनी गुगलच्या मदतीने प्रश्न सोडविले.
सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांना खूश करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना तसेच विरोधी पक्षातील भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटनासुद्धा नाराज होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनएसयूआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी लावून धरली होती. राजकीय दबाब पाहता विद्यापीठाने हा निर्णय घेतला.