आरटीओने जप्त केल्या ओला-उबेरच्या १३ बाइक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 11:46 AM2022-02-15T11:46:33+5:302022-02-15T11:52:24+5:30
असे सांगितले जाते की, खासगी कंपन्यांसाठी अजूनही बाइक पॉलिसी तयार झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार कंपनीच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नागपूर : प्रवासी वाहून नेण्यासाठी बाइकचा वापर करता येत नाही. शहरात सध्या असा वापर केला जात आहे. ओला-उबेर कंपनीच्या बाइक टॅक्सी प्रवाशांची ये-जा करण्यासाठी वापरल्या जात आहे. शहर परिवहन विभागाने (आरटीओ) सोमवारी याविरोधात कडक कारवाई करीत १३ गाड्या जप्त केल्या. सोमवारी शहरभरात ही मोहीम राबविण्यात आली.
आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता दररोज अशी मोहीम राबविण्यात येईल. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनातील पथकाने एक डमी प्रवासी बनून ओला-उबेरची बाइक बुक केली. त्यांना आरटीओ कार्यालयाजवळ बोलावून बाइक जप्त करण्यात आली. जप्त वाहनांना एक महिना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईत हर्षल डाके, आयएमव्ही आनंद मोड, रवींद्र राठोड, विजय सिंह राठोड यांचा सहभाग होता.
परिवहन विभागानुसार बाइकवर प्रवासी बसवण्यास परवानगी नाही. परवानगीशिवाय ओला-उबेर कंपनी आपल्या बाइक टॅक्सी रस्त्यांवर चालवत आहेत. असे सांगितले जाते की, खासगी कंपन्यांसाठी अजूनही बाइक पॉलिसी तयार झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार कंपनीच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- बाइकविरोधात शहर राबवणार मोहीम
शहरात मागील काही दिवसांपासून ओला आणि उबेरच्या बाइकचा प्रवासी वाहण्यासाठी वापर वाढला आहे. प्रवासी वाहून नेण्यासाठी बाइकचा वापर कुठल्याही अटीवर मान्य नाही. त्यामुळे याविराेधात शहरात मोहीम चालवण्याची तयारी केली आहे. येणाऱ्या दिवसांत अशा बाइक व कंपनीवर कारवाई केली जाईल.
प्रवासी नेण्याची परवानगी नाही
दुचाकी वाहनांवर प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी नाही. असे करणे धोकादायक व अवैध आहे. आज शहरात याविरोधात मोहीम चालविण्यात आली. पुढेही अशीच कारवाई केली जाईल.
रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर