कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारावेळी धुडकावले जात आहेत नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:12 AM2021-02-23T04:12:10+5:302021-02-23T04:12:10+5:30
रिॲलिटी चेक नागपूर : कोरोना व्हायरसमुळे विदर्भात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याला कोणी ...
रिॲलिटी चेक
नागपूर : कोरोना व्हायरसमुळे विदर्भात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याला कोणी गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कारासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. परंतु नियम धुडकावून कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंकार होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत उघडकीस आले आहे.
‘कोव्हिड-१९’ मुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याच्यावरील अंत्यसंस्कारासाठी कठोर नियमावली आहे. कोरोनाग्रस्त मृतदेह हा एका बॉडी बॅगमध्ये म्हणजे एका विशिष्ट कव्हरमध्ये गुंडाळलेला असावा. मृतदेह हाताळणारी व्यक्ती प्रशिक्षण प्राप्त असावी. अंत्यसंस्कारावेळी लोकांनी गर्दी करू नये. नातेवाईकांनी मृतदेहाला पाहताना लांबून पाहावे. त्या मृतदेहाला मिठी मारू नये किंवा त्याच्या फार जवळ जाऊ नये. कोरोनाग्रस्त मृतदेहावर शक्य तितक्या लवकर अंत्यसंस्कार करावेत. मृतदेह जास्तीतजास्त पाच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या धर्मानुसार दहन किंवा दफन करावा. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना रुग्णालयातील स्वयंसेवकांची मदत घ्यावी. विशिष्ट धर्माच्या पद्धतीनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येतील, पण शरीराला स्पर्श होईल असे अनावश्यक विधी करू नयेत. याशिवाय घाटावरील कर्मचाऱ्यांनीही विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे या नियमावलीत म्हटले आहे. परंतु रुग्णालयातून कोरोनाग्रस्त मृतदेह बोहर येताच जोगोजागी नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात गर्दी
‘लोकमत’ने सोमवारी मोक्षधाम घाटावर कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची पाहणी केली असता रुग्णालयातून रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन आलेले मनपाचे कर्मचारी योग्य पद्धतीने पीपीई किट घालून नव्हते. डोक्यावर टोपी व नाकाला मास्क नव्हता. मृतदेहाच्या फार जवळ नातेवाईक होते. त्यांच्याकडे पीपीई किट किंवा योग्य पद्धतीचे मास्क नव्हते. अंत्यसंस्काराच्या वेळी जास्तीत जास्त पाच नातेवाइकांचा नियम असताना २५वर नातेवाइकांनी गर्दी केली होती. यातील काहींचे मास्क तोंडावर नव्हते.
- अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीकडे ना ग्लोव्हज, ना मास्क
अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहावर लाकडे किंवा गट्टू रचणाऱ्या मोक्षधामधील कंत्राटदाराचा कर्मचाऱ्यांकडे योग्यपद्धतीचा मास्क नाही. साध्या कापडाचा मास्क आहे. तोही नाकावर नव्हता. ग्लोव्हज किंवा प्रतिबंधक नियमांचा वापर न करताच अंत्यसंस्काराची तयारी करीत होता. त्याला बोलते केल्यावर ‘कुछ नही होता’ एवढे म्हणून दुसऱ्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेला.