नागपुरात आंबेडकर-मानमोडे भेटीने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:40 PM2019-07-27T13:40:28+5:302019-07-27T13:41:03+5:30
निर्मल समूहाचे अध्यक्ष व काँग्रेस नेते प्रमोद मानमोडे यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्मल समूहाचे अध्यक्ष व काँग्रेस नेते प्रमोद मानमोडे यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्याने राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क मांडले जात आहे.
मानमोडे हे दक्षिण नागपुरातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी याच महिन्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशा स्थितीत मानमोडे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध कयास लावण्यात येत आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात मानमोडे यांना विचारले असता वंचित बहुजन आघाडीसोबत युती व्हावी ही काँग्रेसच्या नेत्यांचीदेखील भूमिका आहे. त्या अनुषंगानेच मी त्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली, असे सांगितले. याशिवाय अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.