नागपुरात साधना सहकारी बँकेची साईट हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 09:47 PM2019-08-17T21:47:10+5:302019-08-21T14:03:25+5:30
साधना सहकारी बँकेची साईट हॅक करून सायबर गुन्हेगारांनी बँकेचे ५ लाख, ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधना सहकारी बँकेची साईट हॅक करून सायबर गुन्हेगारांनी बँकेचे ५ लाख, ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. शुक्रवारी दुपारी १२. २० वाजता ही बाब उघड झाल्यानंतर बँक प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. वेळीच बँक अधिका-यांनी आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी रक्कम वाचली. दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पोपटलाल देसाई (वय ५२) यांनी जरीपटका पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
साधना सहकारी बँकेचे मुख्यालय जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२. २० वाजता सायबर गुन्हेगाराने बँकेची साईट हॅक करून डाटा चोरला. त्यानंतर बँकेचे लॉगिन आणि पासवर्डचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटात ५ लाख, ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले.
दरम्यान, बँकेची साईट हॅक झाल्याचे आणि सायबर गुन्हेगार बँक खात्यातील रक्कम दुसरीकडे वळती करत असल्याचे लक्षात आल्याने बँकेच्या अधिका-यांनी लगेच आवश्यक उपाययोजना करीत रक्कम फ्रीज केली. त्यानंतर जरीपटका पोलिसांसोबत संपर्क साधला. सायबर शाखेच्या अधिका-यांनाही सूचित केले. पोलिसांनी कलम ३७९, ४२० भादंवि तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (ब, क, ड)अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
बँकींग वर्तुळात खळबळ
साधना सहकारी बँकेची साईट हॅक करून रक्कम लंपास केल्याच्या वृत्ताने बँकिंग वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. यापूर्वी अशाच प्रकारे नागपुरात मुख्यालय असलेल्या एका खासगी बँकेची रक्कम सायबर गुन्हेगारांनी वळती केली होती. तर, पुण्यातीलही एका बँकेचे ९४ कोटी रुपये अशाच पद्धतीने सायबर गुन्हेगारांनी हडप केले आहे. त्या गुन्हेगारांचा अद्यापही शोध लागलेला नाही, हे विशेष !