साहिलने केली होती बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:20 PM2020-08-05T21:20:41+5:302020-08-05T21:30:18+5:30
नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट घेतल्यानंतर नंदनवन
पोलिसांकडून साहिलला अटक केली जाणार आहे. साहिलच्या विरोधातील हे सहावे प्रकरण आहे.
नंदनवन निवासी अविनाश रारगोडे यांचे वडील श्यामराव यांचे रमणा मारोती येथे दोन हजार चौ.फुटाचे भूखंड होते. या जागेचे वर्तमान मूल्य एक कोटी रुपये इतके आहे. रघुवीर शर्मा नावाच्या व्यक्तीने श्यामराव रारगोडे यांच्या नावाचे बनावट मृत्यूपत्र बनवून हा भूखंड आपल्या नावे केला आणि नंतर साहिलला विकला. ही बाब कळताच अविनाश रारगोडे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपासास सुरुवातही केली. तथाकथित रघुवीर शर्मा याचा कधीच पत्ता लागला नाही. मात्र, पोलिसांकडून साहिलची कधीच विचारपूस झाली नाही. त्यानंतर पोलिसांनी रघुवीर शर्मा सापडत नसल्याचे सांगत न्यायालयाकडे आरोपपत्र पाठविण्यात आले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयातच प्रलंबित होते. २०१९ मध्ये अविनाश रारगोडे यांनी न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यासाठी आवेदन केले. याच आधारावर न्यायालयाने नंदनवन पोलिसांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहे.
नंदनवन पोलिसांनी केलेल्या तपासात साहिलने हा भूखंड परवेज नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी औद्योगिक कर्मचारी गृह निर्माण संस्थेची बनवाट एनओसीही घेतली होती. याच आधारावर साहिलला या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले आहे. न्यायालयाने पुन्हा तपासाचे आदेश दिल्यानंतर आणि नंदनवन पोलीस या प्रकरणात गंभीर झाल्याने साहिलचे कारनामे पुढे यायला लागले आहेत. या प्रकरणात तत्कालीन तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नंदनवन पोलिसांनी आज प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केले असून, गुरुवारी त्याला तुरुंगातून अटक केली जाईल.
अॅलेक्सिस प्रकरणात नीलिमाला अटक
साहिलची पत्नी नीलिमा जायस्वाल ऊर्फ तिवारीलासुद्धा अॅलेक्सिस हॉस्पिटल प्रकरणात तुरुंगातून अटक करण्यात आली आहे. तिला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले जाईल. या प्रकरणाशी जुळलेल्या लोकांची नजर मनपाच्या अधिकाऱ्यावर खिळली आहे. याच अधिकाऱ्याची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. कोट्यवधी रुपये उकळण्यासाठीच हा प्रकार घडविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच या प्रकरणात हप्ता वसुलीचा गुन्हाही नोंद केला आहे. अशास्थितीत पोलीस मनपा अधिकाऱ्याबाबत कोणते पाऊल उचलतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.