नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षकाच्या विरोधात कारवाईच होत नसल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. वेतन पथक अधीक्षकांना तत्काळ निलंबित करून त्यांच्या गैरप्रकाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासंदर्भात शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) पुणे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाला पत्र देऊनही कुठलीच कारवाई झालेली नाही.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक अधीक्षक पदावर कार्यरत असलेले निलेश वाघमारे हे पूर्वी शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक होते. त्या पदावर असताना त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली सावनेर येथे झाली होती. तिथून त्यांनी आपली बदली माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षक पदावर केली. तिथेही त्यांच्या विरोधात तक्रारी वाढल्याने काही काळासाठी त्यांचा चार्ज काढण्यात आला होता. परत त्यांनी मंत्रालयस्तरावर प्रयत्न केल्याने त्यांना प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक अधीक्षकाचा चार्ज देण्यात आला. त्यांच्या गैरप्रकाराच्या वेगवेगळ्या तक्रारी गाणार यांनी मंत्रालयापर्यंत केल्या. अधिवेशनातदेखील विषय उचलून धरला. तेव्हा शिक्षण राज्यमंत्र्यांनी आठ दिवसांत कारवाई करतो, असे आश्वासन दिले होते. पण कारवाई झाली नाही. आमदार नागो गाणार यांच्या तक्रारीच्या आनुषंगाने शिक्षण सहसंचालक व्ही. के. खांडके यांनी नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून तत्काळ निलंबित करून गैरप्रकाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करावी, असे आदेश दिले. शिवाय या प्रकरणात सहसंचालकांनी शिक्षण उपसंचालकांना शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम १०चा भंग होत असल्याचा दाखलाही दिला, पण आजही वाघमारे आपल्या पदावर कायम आहेत.
या प्रकरणात आर्थिक बाबी जुळल्या आहेत
वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर कारवाई होत नाही. पत्राच्या माध्यमातून कारवाईचे नाटक केले जाते, कृती मात्र केली जात नाही. शिक्षण राज्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन देऊनही पालन होत नाही. याचाच अर्थ या प्रकरणात आर्थिक बाबी जुळलेल्या आहेत, असा आरोप आमदार गाणार यांनी केला.