शाळेच्या दप्तराऐवजी पाठीवर आला समोशाचा पिंप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 01:13 PM2020-09-07T13:13:49+5:302020-09-07T13:17:03+5:30
१० रुपये प्लेट समोसा विकून भागत नाही, असे तो सांगतो. सर, कोई अच्छे पैसे दिलानेवाली नोकरी मिलेनगी क्या, असा त्याचा निरागस तेवढाच स्वाभिमानी सवाल आहे. आत्मनिर्भरतेचा ढोल बडविणाऱ्या मंडळींसाठी प्रियांशू मॉडल ठरावा.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्याचे वय शाळेत जाण्याचे आहे, खेळण्या बागडण्याचे आहे. मात्र परिस्थिती त्याला तशी परवानगी देत नाही. नियतीने शाळेच्या दप्तराऐवजी त्याच्या हातात समोसाचा पिंप दिला आहे. त्यामुळे पायी अथवा सायकलने दिवसभर इकडे तिकडे फिरून तो समोसे विकतो आणि कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी निराधार आईला मदत करतो. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कोणतीही शासकीय सवलत मिळत नाही. कथित समाजसेवक डोळ्यावर झापड ओढून असल्यामुळे त्यांना मदतीचा हात मिळत नाही. त्यामुळे या निरागस जिवाला रात्री उशिरापर्यंत जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समाजसेवेचा आव आणणाऱ्या मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही करुण कहाणी नागपुरातील प्रियांशू झा या ११ वर्षाच्या निरागस मुलाची आहे.
प्रियांशू गुड्डू झा त्याची आई चुनमुन, १७ वर्षीय बहीण अनामिका आणि १४ वर्षाच्या पंकज नामक भावासोबत लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशपांडे लेआउट मध्ये राहतो. २० वर्षांपूर्वी बिहारमधून रोजगाराच्या शोधात गुड्डू झा पत्नी चुनमूनसह नागपुरात आला. रस्त्यावर समोसे विकून त्याने आपली उपजीविका सुरू केली. पहाता पहाता त्यांना तीन मुले झाली. भाड्याच्या खोलीत राहून आपला संसार चालविणारे गुड्डू कुणाच्या घेण्यादेण्यात राहत नव्हते. आपल्या हक्काचे पैसे मागितले म्हणून वर्षभरापूर्वी ते गुंडांच्या क्रौयार्ला बळी पडले. रस्त्यावर समोसे विकणाऱ्या गुड्डू झा यांची हत्या झाली अन झटक्यात त्यांचे कुटुंब निराधार झाले.
प्रियांशूच्या आईने डोक्यावरचा पदर ओढून कंबरेला खोचला
पतीच्या हत्येमुळे जगायचं कस, असा प्रश्न प्रियांशूच्या आईसमोर उभा ठाकला.
सातवी पर्यंत शिकलेल्या चुनमून यांना तीन मुले सांभाळायची होती. स्वत: सोबत मुलांना जगवायचे होते. आप्तस्वकीय बिहारमध्ये राहतात. तेथे जाऊन करणार काय, असा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी डोक्यावरचा पदर ओढून कंबरेला खोचला आणि घरोघरी जाऊन स्वयंपाक करू लागल्या. तुटपुंज्या मिळकतीतून त्या मुलांचे पालन-पोषण करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि रोजच्या खाण्याघेण्याचा खर्च त्यातून भागण्याचा प्रश्नच नव्हता. अशात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांप्रमाणे त्यांच्याही हातचे काम सुटले. खाऊ कसे आणि मुलांना खाऊ घालावे कसे असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांनी घरीच समोसे बनविणे सुरू केले. रोज ५० ते ६० समोसे बनवायचे. पिंपात भरून ते कधी पंकज तर कधी प्रियांशूच्या डोक्यावर द्यायचे. हे दोघे कधी पायदळ तर कधी सायकलने पायपीट करत रात्री ९ वाजेपर्यंत समोसे विकतात. दस रुपये प्लेट समोसे लेलो सहाब, असे म्हणून रस्त्यावर बसलेल्यांच्या पुढे जातात. अवघ्या दहा रुपयात दोन समोसे मिळत असल्यामुळे काही जण ते आनंदाने घेतात. मात्र दारुडे, उपद्रवी समोसे घेऊनही पैसे देण्यास मागेपुढे पाहतात. मुलगा लहान दिसतो म्हणून त्यांना पिटातात. प्रसंगी शिवीगाळही करतात. पंकजला हे सहन होत नाही. चिमुकला प्रियांशू हे सर्व मुकाटपणे सहन करत, रोज दोनशे ते तीनशे रुपये आपल्या आईच्या हातात ठेवतो. रात्री स्वत: स्वत:चे दुखरे पायही चोळून घेतो. त्याची ही कर्मकथा मोहल्ल्यातील अनेकांना माहित आहे. मात्र, सेल्फी छाप मदतकर्ते डोळ्यावर झापड घालून आहेत. कोणत्याही कथित समाजसेवकाने या गरीब निराधार कुटुंबाला व्यक्तिगत मदत सोडा, शासकीय सोयी सवलती मिळवून देण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. चुणचुणीत प्रियांशूला तशी अपेक्षाही नाही. १० रुपये प्लेट समोसा विकून भागत नाही, असे तो सांगतो. सर, कोई अच्छे पैसे दिलानेवाली नोकरी मिलेनगी क्या, असा त्याचा निरागस तेवढाच स्वाभिमानी सवाल आहे. आत्मनिर्भरतेचा ढोल बडविणाऱ्या मंडळींसाठी प्रियांशू मॉडल ठरावा.
पंकजची शाळा सुटली
रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे पंकजची शाळा सुटली आहे. दहावीचा विद्यार्थी असलेल्या पंकजने गेल्या सत्रापासून शाळेत जाणे बंद केले आहे. स्वत:च्या शिक्षणाऐवजी हे दोघे भाऊ आपल्या बहिणीच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत, हे आणखी एक विशेष!