मुंबई/ नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी आंदोलकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी नागपूर येथून अटक केलेल्या संदीप गोडबोले याला गुरुवारी मुंबई दंडाधिकारी यांनी १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नागपुरातून बुधवारी ताब्यात घेतलेल्या एसटीचा बडतर्फ कर्मचारी संदीप गोडबोले हा बहुजन अधिकारी कर्मचारी संघटनेचा विभागीय अध्यक्ष असल्याचे पुढे आले आहे.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या म्हणण्यानुसार, गोडबोले या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता, तो आमदार निवासमध्ये थांबला होता, हे त्याने स्वत: न्यायालयात मान्य केले आहे. कोणत्या आमदाराच्या ओळखीवरुन तो आमदार निवासात थांबला होता, याची चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडी मागण्यात आली,' अशी माहिती घरत यांनी दिली.
गोडबोले आहे संघटनेचा अध्यक्ष
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणाचे धागेदोरे नागपूरशीही जोडले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बुधवारी नागपूर गाठून गणेशपेठ आगारातील जानेवारी २०२२ रोजी संपात सहभागामुळे बडतर्फ झालेल्या व पूर्वी यांत्रिक संवर्गातील गोडबोले या कारागीर (क) पदावरील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले होते.
तो बहुजन अधिकारी-कर्मचारी संघटनेचा विभागीय अध्यक्ष असून, तो संपात सहभागी होता. तो अनेकदा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटला. अनेकदा त्याने सदावर्ते यांच्यासह न्यायालय परिसरात हजेरी लावली होती. हल्ल्याच्या दिवशीही तो सदावर्तेसोबत व्हॉट्सअॅप कॉलवर बोलला होता. तो संपाशी संबंधित चित्रीकरण सोशल मीडियावर टाकून इतरांना माहिती देत होता.