नितीन नागपुरे
नागपूर : दहावीला ८५ टक्के! उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा टप्पा गाठण्याचा संकल्प. गरिबीतही ती परिस्थितीशी लढली. बारावीचा टप्पाही पूर्ण केला. मात्र पदवीचे शिक्षण घेताना आड येणाऱ्या आर्थिक चणचणीतून आलेल्या नैराश्यातून संजना संजय सातपुते (२०) हिची एकाकी झुंज संपली. नैराश्यातून टोकाचा निर्णय घेत गुरुवारी संजनाने मृत्यूला कवटाळले.
नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे शेतकऱ्याच्या मुलीने गरिबीमुळे गळफास लावल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
संजनाचे वडील संजय सातपुते यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे. शेतीसोबतच टेलरिंगचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तिची आई विद्या मजुरीचे काम करते. धाकटी बहीण सिमरन बी.बी.ए. करीत आहे. मला नोकरी लागली की सर्व बरे होईल, असा विश्वास देणाऱ्या संजनाच्या मृत्यूने वडील संजय आणि आई विद्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी संजनाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तिच्या मृत्यूमुळे गरिबीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचे नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या राज्यकर्त्यांनी संजनाप्रमाणेच इतर मुलांवर अशी वेळ येऊ नये यासाठी ठोस निर्णय घेण्याचीही मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.
नरखेड तालुक्यात गतवर्षभरात २० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. अशात वडिलांची अर्धा एकर शेती असताना मिळेल ते काम करून संजनाने वरुड येथे बी.एस्सी.ला प्रवेश घेतला होता.
ऑनलाइन परीक्षेसाठी नव्हता मोबाइल
संजना बी.एस्सी.ला असताना कोविडमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या. मात्र परीक्षा देण्यासाठी मोबाइल नसल्याने न खचता ती शेतात मजुरीच्या कामावर गेली. यानंतर मोबाइल विकत घेत परीक्षाही दिली. मात्र बी.एस्सी. प्रथम वर्षाचा एक पेपर ऑनलाइन सबमिट न झाल्यामुळे तिला अंतिम वर्षाला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ती खूप निराश होती.
कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी नव्हते पैसे
प्रथम वर्षाचा एक पेपर बॅक असल्याने बी.एस्सी.च्या अंतिम वर्षाला प्रवेश मिळाला नसल्याने संजनाने काही दिवस जलालखेडापासून दोन कि.मी.अंतरावरील दूध डेअरीवर काम केले. यानंतर तिने काटोल येथे कॉम्प्युटर क्लासेसकरिता प्रवेश घेतला होता. परंतु रोज काटोलला जाण्यासाठी पैसे नसल्याने ती खचली होती.
मुलींना शिकवायचे की जगवायचे?
अर्धा एकर शेती असलेले संजय सातपुुते कोविड काळात रोजगार नसल्याने खचले होते. अशात यंदा अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत मुलींना शिकवायचे की जगवायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र संजनाच्या मृत्यूने ते पूर्णपणे खचले आहेत. वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने संजनाने त्यांना कधीही शिक्षणासाठी पैसे मागितले नाही. मिळेल ते काम करून शिक्षण सुरू ठेवले.
स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि नोट्सही
संजना चांगली नृत्य करायची. नृत्य स्पर्धेत नेहमी तिचा पहिला क्रमांक यायचा. पदवी शिक्षण घेताना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. यासाठी तिने पुस्तकेसुध्दा विकत घेतली होती. शुक्रवारी लोकमत प्रतिनिधीने तिच्या घरी भेट दिली असताना स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि फॉर्मुल्यांचे चार्ट, नोट्स दिसून आले. निराशेतून दोन दिवसांपूर्वी संजनाने तिची सर्व कागदपत्रे जाळली होती. मात्र मृत्यूपूर्व तिने लिहिलेली कुठलीही चिठ्ठी आढळून आली नाही.
प्रशासनाला कधी येणार जाग?
गरिबीमुळे संजनाने आत्महत्या केली. मात्र गत दोन दिवसात तालुका प्रशासनाचा एकही अधिकारी तिच्या घरी पोहोचला नाही. गुरुवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जलालखेड्याचे ठाणेदार मनोज चौधरी या घटनेचा तपास करीत आहेत.