नागपूर :रामटेकचे आ. आशिष जयस्वाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी रामटेकवर फोकस केला आहे. राऊत यांनी नागपुरात येत रामटेक लोकसभेसह विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जयस्वाल गेले त्याचा किती फटका बसेल, रामटेकच्या गडावर आपण पुन्हा भगवा फडकवू का, याची ग्राउंड रिॲलिटी राऊत यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
राऊत यांचे विमानतळावर शिवसैनिकांनी जोरात स्वागत केले. यानंतर त्यांनी रविभवनमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. रामटेक लोकसभेचे संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख राजू हरणे, युवासेना पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकडे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी शुभम नवले आदींकडून राऊत यांनी रामटेक लोकसभा व विधानसभेची माहिती घेतली. यावेळी उपस्थितांनी आमदार गेले, दोन-चार पदाधिकारी गेले; पण मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितले. आपल्यासोबत कोण कोण आहेत व कोण जाऊ शकतात, याचा लेखाजोखाही पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्यासमोर मांडला. यावेळी नागपूरचे संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, माजी नगरसेवक बंडू तळवेकर आदी उपस्थित होते.
संदीप इटकेलवार यांची दांडी
- खा. कृपाल तुमाने व शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार राऊत यांच्या बैठकीला उपस्थित नव्हते. तुमाने यांनी तसे कळविले होते. पण इटकेलवार यांच्याकडून कुठलाही निरोप नव्हता, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. रामटेकच्या बैठकीत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इटकेलवार हे शिवसेनेच्या बैठकांपासून दूर राहत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.